उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीत वस्ती योजनेतील ९ कोटी २५ लाख रुपर्यांच्या घोटाळ्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत  घोटाळ्यावर हल्लाबोल केला. दलित वस्ती घोटाळ्यात औरंगाबाद विभागीय चौकशी समितीने सर्व दोषी संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन महिना झाला तरी जिल्हाधिकारी यांनी कारवाई न केल्याने आमदार ठाकूर यांनी या प्रकरणात ईडी चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर ठपका ठेवल्याने गुन्हा नोंद करुन सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली.
विभागीय आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार व बैंक यांना नोटीस बजावून सुनावणी घेऊन म्हणणे सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सर्व संबंधीतांना सुनावणीच्या नोटीसा बजावल्या आहेत. नोटीसीनंतर त्यांनी दिलेले खुलासे व विभागीय आयुक्त यांच्या चौकशी अहवालातील वस्तुस्थिती पाहून दोषीवरील जबाबदारी अंतिम करण्यात येणार आहे. या प्रकरणात केवळ एक खुलासा येणे बाकी असून, तो आल्यानंतर पुढील कारवाई प्रक्रिया करण्यात येईल. आगामी ८ दिवसांत या प्रकरणातील दोषींवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. ठेकेदार व बैंक यांचा खुलासा प्राप्त झाला आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.असे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 
 
Top