उस्मानाबाद / प्रतिनिधी:
दि. 23 मार्च 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सर्वत्र कोरोना विषाणुच्या साथीच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने राज्यात व जिल्ह्यात लागु केलेल्या कलम 144, लॉकडाऊन, व सोशल डिस्टंसींगच्या उपाययोजनांच्या धर्तीवर घेता येत नसल्यामुळे तहकुब करण्यात आली होती. सदरची सभा  दिनांक 19 जुन 2020 रोजी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. सदर सभेमध्ये खालील प्रमाणे विषयांवर सकारात्मकदृष्टीने चर्चा होवुन विषय बहुमताने मंजुर करण्यात आले.
 नुकत्याच झालेल्या भारत-चीन सिमेवरील नियंत्रण रेषेवरील भागात झालेल्या संघर्षामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना तसेच कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण होवुन मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना जिल्हा परिषद सभागृहाच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
तसेच कारोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी, विषय समितीचे सभापती, इतर पदाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी तसेच जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील यंत्रणेकडून यामध्ये आरोग्य विभागांतर्गत, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, यांनी अतिशय चांगल्याप्रकारे काम केल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा हा सुरुवातीपासून ग्रीनझोनमध्ये राहुन जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला नाही. यासाठी सर्व यंत्रणेने केलेल्या उत्कृष्ट कामासाठी सभागृहाच्यावतीने अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या स्वसंपादित उत्पन्नाचे सन 2019-20 चे सुधारीत व सन 2020-21 चे मुळ अंदाजपत्रकास जि.प.सर्वसाधारण सभेकडून 31 मार्च 2020 पूर्वी मान्यता देणे आवश्यक असते, तथापी सदर कालावधीत कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु असल्यामुळे सर्वसाधारण सभेच्या आयोजनाला शासनाकडून परवानगी मिळाली नव्हती, त्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून सदर अर्थसंकल्पास मान्यता देवुन आगामी जि.प.सर्वसाधारण सभेत सदरचा अर्थ संकल्प अवलोकनार्थ ठेवण्यात यावा असे शासनाचे निर्देश प्राप्त झालेले होते. त्यानुषंगाने, सदर अर्थसंकल्पास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापुर्वीच मंजुरी दिलेली असुन आजच्या सभेमध्ये सदर अर्थसंकल्प सभागृहाच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आला होता. त्यावर सर्वानुमते चर्चा करण्यात आली.
तसेच 13 व्या वित्त आयोगाचा शिल्लक निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या रक्कमेवरील व्याजाची रक्कम ही अर्सेनिक अल्बम-30 ह्या औषधाच्या खरेदीसाठी शासनखाती जमा करण्यात यावी असे शासनाचे निर्देश आहेत, तथापी सदरचा निधी हा मोठ्याप्रमाणावरील निधी आहे, बहुतांश ग्रामपंचायती सदरचा निधी शासनाकडे परत करण्यास तयार नाहीत, त्यामुळे सदर निधी शासनाकडे वर्ग न करता, सदर निधीमधून ग्रामपंचायत स्तरावरच सदरचे औषध खरेदी करण्यास परवानगी देण्यात यावी, याबाबत मा.अध्यक्ष महोदयांनी ठराव मांडला तो सर्वानुमते मजुर करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2019-20 च्या सुधारीत व सन 2020-21 च्या वार्षिक कृती आराखड्यास व लेबर बजेटला मंजुरी देणेबाबतचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. सदर ठरावामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांनी मंजुर केलेले आराखडे संकलीत करुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वार्षिक कृती आराखडा व लेबर बजेट तयार करण्यात आलेले आहे. त्यास सभागृहाने बहुमताने मंजरी प्रदान केली.
तसेच आगामी खरीप हंगामाच्या पुर्व तयारीचा भाग म्हणून शेतकऱ्यांना बांधावर बि-बियाणे, खते उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात आल्याचे मा.जिल्हा परिषद अधक्ष यांनी सभागृहाला सांगीतले. तसेच शासन निर्देशानुसार शाळेचे वर्ग सुरु करण्यासाठीची पुर्व तयारी करणे सुरु असल्याचे मा.जिल्हा परिषद, अध्यक्ष यांनी सभागृहामध्ये सांगीतले. सभेच्या शेवटी, जिल्ह्याच्या विकास कामांच्यादृष्टीने धोरणात्मक बाबींसाठी सर्व सदस्यांनी पक्षीय मतभेद बाजुला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी केले.
याप्रमाणे,   दि. 19 जून 2020 रोजी, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या दिनांक 23 मार्च 2020 रोजीची तहकुब सभेचे कामकाज सर्व सदस्यांनी सकारात्मक चर्चा करुन राष्ट्रगीत घेऊन संपन्न झाले.
 
Top