वारसांना लाभ देण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन
उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 कोरोना संक्रमण काळात सेवा बजावत असताना नगर परिषद कर्मचार्‍याचा कोरोना विषाणू संसर्ग होऊन मृत्यू झाला. नगर परिषदेच्या कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची मराठवाड्यातील पहिली दुर्दैवी घटना आहे. या कर्मचार्‍याच्या वारसांना विम्याचा लाभ देण्यात यावा तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष दीपक तावडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.15) दुपारी दोन वाजेपर्यंत कामबंद आंदोलन करुन जिल्हाधिकारी व नगर परिषद मुख्याधिकार्‍यांना मागणीचे निवेदन दिले.
उस्मानाबाद नगर परिषदेतील शिपाई (मज्जीद अहमद शेख) यांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली. त्यांचा 14 जून रोजी मृत्यू झाला  आहे.  सोमवारी  त्यांना नगर परिषद कर्मचार्‍यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सदरील कर्मचार्‍याच्या वारसांना शासन निर्णयाप्रमाणे विम्याचा लाभ देण्यात यावा. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत विनाअट सामावून घ्यावे, अशी मागणी नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच निवेदनाची दखल न घेतल्यास यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही कर्मचारी संघटनेने दिला आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष दीपक तावडे, उपाध्यक्ष जगदीश निंबाळकर, सचिव रावसाहेब शिंगाडे यांची स्वाक्षरी आहे.
 
Top