उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वेबपोर्टलचा लाभ घेऊन बेरोजगाराना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही तांत्रिक कारणास्तव बेरोजगार झालेल्या ज्या नौकरी इच्छुक बेरोजगार उमेदवाराना नौकरीची गरज आहे, अशा उमेदवारानी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनीही या वेबपोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद या कार्यालयामार्फत सेवा सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये रिक्त पदे आधिसूचित करणे, बेरोजगार उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळ, माहितीची उपलब्धता, रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमातून रिक्त पदे अधिसूचित करणे, कौशल्य विकास प्रशिक्षित उमेदवाराची माहिती, मनुष्यबळ माहिती, पार्श्वभूमी नोंदणीबाबत सुविधा (ईआर-1) हे सर्व www.mahaswavam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बेरोजगार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल नंबर ही माहिती संबंधिताना प्राप्त होऊ शकते. संबंधित आस्थापनेतील रिक्त पदांची नोंदणी वेबपोर्टलवर प्राप्त युजर आयडी व पासवर्डचा वापर करुन माहिती डाऊनलोड करु शकतात. तसेच प्रत्येक ईआर-1 ची सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीनंतर प्रत्येक माहिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरण्याची दक्षता घ्यावी. याबाबत काही अडचणी आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद दूरध्वनी क्र. 02472-222236 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top