उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा मूल्यवर्धीत कर (व्हॅट) देशात सर्वाधिक आहे. राज्यात पेट्रोलवर ३८.११ टक्के तर डिझेलवर २१.८९ टक्के व्हॅट आकारला जातो. त्यामुळेच महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा सर्वाधिक झटका बसतो. काँग्रेसने राज्य सरकारला आधी कर कमी करायला सांगावा, नंतरच आंदोलन करावे, असा खोचक सल्ला भाजपचे नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सतीश दंडनाईक यांनी काँग्रेसला दिला आहे.
इंधनदरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या आंदोलनाला उत्तर देताना दंडनाईक यांनी म्हटले आहे की, राज्याचा सुमारे १४ टक्के म्हणजे वर्षाला २५००० कोटी रुपये महसूल जवळपास पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करातून येतो. पेट्रोलची मूळ किंमत केवळ ३९.२१ प्रति लिटर इतकी आहे. त्यावर महाराष्ट्र सरकार प्रति लिटरला २५.३० रुपये इतका कर आकारते तर डिझेलला प्रति लिटरला १७.०५ इतका कर आकारते. केंद्र सरकार पेट्रोल व डिझेल वर प्रति लिटरला अनुक्रमे १९.४८ रुपये व १५.३३ रुपये इतका कर आकारते. यातून मिळालेले उत्पन्न देशातील सर्व राज्यांना विकास कामांसाठी वितरित केले जाते.
राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस हा मुख्य घटक आहे. काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन पुकारले असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन आहे, तुम्हाला जनतेची चाड असेल तसेच तुमच्याकडे नैतिकता असेल तर तुम्ही राज्य सरकारमध्ये असलेल्या आपल्या नेत्यांना पेट्रोल, डिझेलवर राज्य सरकारकडून आकारला जाणारा कर कमी करायला सांगा आणि मगच आंदोलन करा.
 
Top