लोहारा /प्रतिनिधी
 प्रदीर्घ सेवेनंतर आमच्या परिवारातील कर्मचारी जरी सेवानिवृत्त झाले तरी ते आमच्या परिवारातीलच घटक असल्याने ते कायम या परिवाराचे सदस्य राहतील असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण  पाटील यांनी केले.
मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक काशीनाथ मिरगाळे, प्रा.विष्णू शिंदे, सहशिक्षक राहूल गायकवाड व कर्मचारी महावीर नारायणकर या चौघांचा सेवानिवृत्तीबद्ल प्रतिभा निकेतन विद्यालयात नगर शिक्षण विकास मंडळाच्या वतीने दिनांक 30 जून 2020 रोजी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील व नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते सपत्नीक भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
 यावेळी पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले की, नगर शिक्षण विकास मंडळ ज्या उद्देशाने कै.माधवराव उर्फ काका यांनी  या संस्थेत जी परंपरा चालविली त्या परंपरेनुसार या संस्थेत आपण दिलेल्या योगदान व सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करत असताना आम्हाला खूप सार्थ अभिमान वाटतो. आपल्या हातून जी सेवा घडली ती अशीच सेवा पुढच्या काळात देखील आपल्या हातून घडावी हीच सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या कोरोना संकटाचे सावट असल्याने परिवारातील सर्व घटकांनी एकमेकांची काळजी घेणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी प्रमुख म्हणून श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, माजी मुख्याध्यापक गुरुसिध्द वर्दे, उपप्राचार्य सुधीर अंबर, आदीं, उपस्थित होते. प्रारंभी कै.माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, गुरुसिद्ध वर्दे, काशीनाथ मिरगाळे, राहुल गायकवाड, सुधीर अंबर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.करबसाप्पा ब्याळे यांनी व सूत्रसंचालन सहशिक्षक उल्हास घुरघुरे यांनी केले तर आभार इरफान मुजावर यांनी मानले.

 
Top