उमरगा/ प्रतिनिधी:
भगवान बुद्धांची शिकवण समजून घेण्यासाठी वर्षावास निमित्ताने प्रत्येक गावातील आपल्या विहारात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आवाहन बौद्ध धम्मगुरु भंते धम्मसार यांनी केले.
  उमरगा येथील दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट कपिलवस्तू परिसरातील बौद्ध विहारातुन शुक्रवारी दि १९ रोजी  भंते बोलत होते.
  पुढे बोलताना धम्मसार म्हणाले की, बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षा काळात भिक्खू संघ चारीका करण्या ऐवजी एका ठिकाणी विहारात थांबून ध्यान साधना,धम्म अभ्यास करत असत. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत, एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत असत. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणुन तेव्हापासुन संपन्न होऊ लागला. वर्षावास म्हणजे पावसाळयातील निवास.या काळात भीक्षु लेण्यांमध्ये राहत असत.  वर्षातील आठ महिने धर्म प्रसार केल्यानंतर वर्षा ऋतुमधील चार महिने भिक्षुंनी एकांतात घालवावे त्यामध्ये त्यांनी ज्ञानसाधना करावी, अन्य भिक्षूंच्या समवेत धर्माबद्दल चर्चा करावी, मनन, चिंतन करावे अशी भगवान बुद्धांची शिकवण होती. अश्या तऱ्हेच्या बौद्ध भिक्षूंच्या वास्तव्याला बौद्ध ग्रंथांमध्ये जी व्याख्या दिली आहे त्याला ‘वर्षावास’ असे म्हणतात. या वर्षावासातील कालखंडात बौद्ध भिक्षुंंनी धर्मचर्चे शिवाय अन्य कामगिरी केल्याचे देखील आपल्याला दिसून येते. या वर्षावासाच्या काळामध्ये ज्या लेण्यांमध्ये हे बौद्ध भिक्षु राहिले तेथे त्यांनी जगाला आश्चर्यचकित करणारी सुंदर शिल्पे कोरली. भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग त्यांनी आपल्या शिल्पकलेच्या कलाकृतीमधून अजरामर केले आहेत.
या वेळी उपासक, उपासीकानी दररोज बौद्ध विचारात जाऊन सुत्त पठनासह धम्म अभ्यास करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या  ग्रंथाचे पठन करावे असे आवाहन भंतेजीनी केले.
 
Top