उमरगा /प्रतिनिधी
तालुक्यातील भिकार सांगवी येथील रहिवासी व सद्यस्थितीत पुणे येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत श्रीधर पांडुरंग भोसले यांना बुधवारी (दि.१०) भारत सरकारने गडचिरोलीच्या भामरागड या नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे. याबद्दल भोसले यांचे ग्रामस्थांसह जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
सद्यस्थितीत पुणे शहर पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीधर पांडूरंग भोसले यांना भारत सरकारच्या वतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले असून यापूर्वी श्रीधर भोसले यांनी गडचिरोली, भामरागड जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट व समाधानकारक सेवा पूर्ण करीत त्यांनी दाखवलेल्या कठीण, खडतर सेवा, कामगिरीची दखल घेत भारत सरकारने आंतरिक सुरक्षा सेवा पदकासाठी निवड केली आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीधर भोसले यांना २०१९ मध्ये नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल विशेष सेवा पदक मिळाले होते. श्रीधर भोसले हे तालुक्यातील भिकारसांगवीचे रहिवासी व पुणे शहर येथे कार्यरत आहेत. प्रारंभी सोलापूर राज्य राखीव दलात २००६ मध्ये पोलिस शिपाई म्हणून रूजू झाले होते. श्रीधर भोसले यांनी २०११ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याने पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली, त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील झारावंडी पोलिस स्टेशन येथे २०१४ मध्ये नियुक्ती देण्यात आल्यावर त्यांनी २०१७ पर्यंत उत्कृष्ट कार्य करत समाधानकारक काम केल्याने नक्षलवादी विरोधात उल्लेखनीय कामगिरी बजावली. या त्यांच्या कार्याची दखल घेत पोलिस विभागाच्या वतीने २०१९ च्या पोलिस विभागाचा विशेष सेवा पदक देवून गौरवण्यात आले होते.
भिकारसांगवीत भूमिपुत्राचे कौतुक यंदा भारत सरकारच्या वतीने गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीधर भोसले यांना आता भारत सरकारच्या वतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल पोलिस दल, उमरगा शहरातील व भिकारसांगवी ग्रामस्थांच्या वतीने कौतुक केले जात आहे.
 
Top