उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाउन लागू केल्यामुळे सर्वच पालक आर्थिक संकटात सापडले असताना शिक्षण विभागाने मात्र सर्व शाळांना 18 मे रोजी एक पत्र पाठवून पालकांना  थकीत फीस भरण्याचे आदेश जारी केले आहेत ,अशा कठीण परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांची थकीत व चालू वर्षाची शैक्षणिक फी माफ करण्याची जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.
एकीकडे शिक्षण विभाग पालकांना फीस भरण्याची सवलत दिली असल्याचे सांगते तर दुसरीकडे शाळेकडून विद्यार्थ्यांना फीस जमा करण्याचे सांगितले जात असल्यामुळे पालकात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे .महाराष्ट्र सरकार सततच विद्यार्थ्यांच्या फीस संदर्भात दुटप्पी भूमिका घेत आहे .अगोदरच महाराष्ट्रात संस्थाचालक वेगवेगळ्या माध्यमांद्वारे विद्यार्थ्याकडून भरमसाठ फी जमा करून लूटमार करत आहेत. त्यातच शासन व संस्थाचालकांमध्ये साटेलोटे असल्यामुळे गोरगरीब व शेतकऱ्यांच्या मुलाकडून अव्वाच्या सव्वा फीस आकारल्यामुळे त्यांची प्रचंड ससेहोलपट सुरू आहे. महाराष्ट्रात शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा बाजार व खेळखंडोबा चालू केलेला आहे. शिक्षण मंत्री व महाराष्ट्र सरकार सतत गोंधळलेल्या अवस्थेत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व पालकांची आर्थिक स्थिती कोलमडल्यामुळे त्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करून आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्याची मागणीही ॲड भोसले यांनी केली आहे.
 
Top