उस्मानाबाद / प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपरिसरच्या संचालकपदाची सुत्रे डॉ. दत्तात्रय गायकवाड यांनी स्विकारली आहेत. विद्यापीठाने २००४ मध्ये उस्मानाबाद केंद्र स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच पूर्णवेळ संचालक याठिकाणी लाभला आहे.
  विद्यापीठाच्या उपपरिसर संचालकपदाची सुत्रे डॉ.दत्तात्रय कृष्णा गायकवाड यांनी  स्विकारली आहेत. शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागात ते कार्यरत होते. लॉकडाऊन संपल्यानंतर १२ जून रोजी ते रुजू झाले. डॉ प्रशांत दीक्षित यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे वरिष्ठ सदस्य मा संजय निंबाळकर, प्राचार्य डॉ जयसिंहराव देशमुख, अधिसभा सदस्य प्रा संभाजी भोसले यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाच्या उप परिसर स्थापनेनंतर (२००४ )  पहिल्यांदाच पुर्णवेळ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परिसराचा पायाभूत विकास व्हावा व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर जयसिंहराव देशमुख प्रयत्नशील आहेत. गेल्या तीन वर्षापासून विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूदही करण्यात येत आहे . परिसराला पूर्णवेळ संचालक केल्यामुळे आता येथील विकास कामांना गती मिळणार आहे. डॉ गायकवाड हे गेल्या ३१ वर्षांपासून शिक्षण अध्यापन संशोधन क्षेत्रात कार्यरत असून अनेक महत्त्वपूर्ण पदावर काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना संचालक ,विद्यार्थी कल्याण संचालक,अधिसभा सदस्य, परीक्षा मंडळ व सत्य विद्या परिषद सदस्य, विभागप्रमुख आदी पदांचा समावेश आहे. योजनेचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे.
डॉ. गायकवाड यांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ प्रवीण वक्ते व कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांनीही अभिनंदन केले आहे .
 
Top