उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूची साथ चालू असून हायरिस्क भागाकडे जास्तीत जास्त लक्ष देवून गुणवतापूर्वक आरोग्य सेवा देण्यातयावी.  आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाच्या योजना  सामान्य जनतेपर्यंत देण्यात याव्यात, अशी सुचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे केल्या.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध विषयाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे बैठक आयोजीत करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आपत्कालीन सेवा 108 रुग्णवाहिका बाबत सद्यस्थिती, रुग्ण कल्याण समिती, कोविड-19 बाबत आरोग्य सेवा व येणाऱ्या अडचणी, कायाकल्प, एडस्, प्रधानमंत्री  मातृवंदना योजना, आरोग्य वर्धिनी अंतर्गत सेवा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम इत्यादी विविध विषयाचा आढावा घेतला. यावेळी  सन 2019-2020 या वर्षाच्या आर्थिक बाबीचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, लातूर आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.एच व्ही बडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी प्रधान मंत्री मातृवंदना योजने अंतर्गत मातांना तिसऱ्या हप्ता देण्यासाठी लाभार्थांच्या कागदपत्रामध्ये पूर्तता होत नाही. त्यामुळे आर्थिक लाभ वेळेवर मिळत नाही. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेस प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व अभियानामध्ये गरोदर मातांची तपासणी व उपचार शिबीरामध्ये कागदपत्राची पूर्तता करुन घ्यावी व लाभार्थींना लाभ देण्यात यावा, असे यावेळी सांगितले.
या बैठकीस डॉक्टर संघटनेचे डॉ. अदिनाथ राजगुरु, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दुल लतिफ, अति. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धनंजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क) डॉ. बी. एच. निपानीकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.रफिक अन्सारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आनंद सोपल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी व जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.

 
Top