लोहारा/प्रतिनिधी
कोरोनाशी लढत लढतच रहाटगाडा सुरू ठेवणे गरजेचे आहे, असे आमदार ज्ञानराज चौगुले यांंनी केले. शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध समस्यांबाबत लोहारा तालुक्यात प्रत्येक जि. प. गटात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात बैठक  घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
सध्या जगभरात कोरोना आजारामुळे विविध दैनंदीन व्यवहार, ठप्प असल्यामुळे ग्रामपातळीवरील शेतकरी व नागरिकांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सदर समस्या जाणून घेण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सामाजिक अंतर राखण्याच्या उद्देशाने लोहारा तालुक्यातील जि.प. पं.स. सदस्य, विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व विविध विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत प्रत्येक गटात समन्वय बैठक आयोजित केली होती.
कोरोना सारख्या महामारीविरुद्ध लढत लढतच आपला रहाटगाडा सुरू ठेवून आपले दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी आपण सर्वांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या सूचनांचे पालन करून आपापले कार्य व जबाबदाऱ्या यथासांग पार पाडल्यामुळे उमरगा लोहारा तालुक्यातील या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
या बैठकीत प्रामुख्याने खरीप पेरणीची तयारी, बी -बियाणे, खते वाटप, शाळा सुरू करता येतील का ?, केल्यास विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पुस्तके वाटपाचे नियोजन, महावितरण विषयक समस्या, अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी, तुरीच्या विम्याचे वाटप, निराधारांचे मानधन मंजुरी व वाटप, या विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सर्व लोकप्रतिनिधींचे म्हणणे व तक्रारी वैयक्तिकरित्या ऐकून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांची कसल्याही प्रकारे अडवणूक करू नये अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीस युवा नेते किरणजी गायकवाड, लोहारा तहसीलदार विजय अवधाने, गटविकास अधिकारी काळे, जि.प.सदस्या शालिनीताई पाटिल, पंचायत समिती सभापती रणखांब ताई, उपसभापती सुधीर कोरे, शिवसेना तालुकाप्रमुख तथा जेवळीचे सरपंच मोहन पनुरे, माजी जि.प. सदस्य दीपक जवळगे,  तालुका आरोग्य अधिकारी कटारे, स्पर्श रुग्णालयाचे समन्वयक रमाकांत जोशी, बसवराज शिंदे, नामदेव लोभे, प्रताप लोभे, अंगद दरेकर, यांसह विविध विभागाचे अधिकारी, सर्व गावांचे तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.
 
Top