उस्मानाबाद (प्रतिनिधी) - लॉकडाऊन असल्यामुळे संचारबंदी देखील करण्यात आलेले आहे. ज्या नागरिकांची महत्त्वाची कामे आहेत अशा नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन ई-सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र नेटवर्क अभावी ही यंत्रणा ठप्प झाली असून त्याचा फटका अनेक नागरिकांना बसू लागला आहे.
ज्या नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तर त्यांच्याकडे ई-पास उपलब्ध असेल तरच इतर जिल्ह्यात प्रवेश दिला जातो. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पास उपलब्ध करून देण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. दि.१५ जून रोजी अनेक नागरिक पास आवश्यक असल्याने  जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या पास सुविधा कक्षात आले होते. मात्र दुपारी १२.३० वाजता नेटवर्कचा तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व प्रक्रिया ठप्प झालेले याठिकाणी जवळपास २५ नागरिक या कार्यालयासमोर ताटकळले होते.
 मी उद्या कंपनीत जायचे कसे ?
ही पास काढण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील दयानंद मारुती ढेकणे हे पास काढण्यासाठी आले होते. मात्र त्यांना नेटवर्क मुळे पास उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळे उद्या कंपनीत दाखल न झाल्यास माझे काम जाऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तहसिलदार माने यांचा फोन बंद
ई- पास देण्यासाठी तहसीलदार राजकुमार माने यांची नियुक्ती केली असून ते आज सकाळपासून कार्यालयाकडे फिरकले नाहीत. तसेच त्यांचा संपर्कासाठी देण्यात आलेला नंबर देखील बंद असल्यामुळे या नागरिकांनी निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्याकडे जाऊ आपले गाऱ्हाणे मांडले खंदारे यांनी मी संबंधितांना फोन करतो असे सांगून त्यांना पुन्हा या कार्यालयाकडे पाठविले मात्र याठिकाणी त्यांची पुन्हा निराशाच झाली.
 
Top