उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत नगर परिषद प्रशासन विभागाने सर्व नियम धाब्यावर बसवून दोन योजनेंतर्गत चार कामांच्या कंत्राटामध्ये साहित्य व अथवा विकासकामे न करता तब्बल ९.५१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अखेर आनंदनगर पोलिस ठाण्यात नायब तहसीलदार संतोष पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगरविकास विभागाचे तत्कालीन तहसीलदार अभय मस्के यांच्यासह कंत्राटदार अशा एकूण सहा जणांविरोधात वेगवेगळे सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
दोन योजनांमधील चार कंत्राटांमध्ये साहित्याची पूर्तता केली असे भासवून बनावट डिलिव्हरी चलनांद्वारे एकूण ९ कोटी ५१ लाख ७२ हजार १०० रुपयांच्या निधीचा अधिकारी व कंत्राटदारांनी अपहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार तत्कालीन जिल्हा नगर प्रशासन अधिकारी अभय देवीदास मस्के, मनोज औदुंबर मोरे, (रा. उस्मानाबाद) ‘आध्या एन्टरप्रायझेस’चे मालक प्रताप राजेंद्र गायकवाड (रा. समर्थनगर, उस्मानाबाद), ‘ए टू झेड एन्टरप्रायझेस’, ‘ए.वन. एन्टरप्रायझेस (बालेवाडी, पुणे), व ‘इ झोन एन्टरप्रायझेस’ चे मालक फहीम जलील शेख (रा. माळी गल्ली, उस्मानाबाद) यांच्याविरोधात कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. खुली व्यायामशाळा उभारण्याच्या कामात २ कोटी ४८ लाख ६९,१०० रुपयांचा अपहार, स्मशानभूमीत विद्युतीकरण करणे, सौर पथदिवे या कामात ४ कोटी रुपयांचा अपहार, चार नगरपालिकांना कॉम्पॅक्टर बसविण्याच्या कामात १ कोटी ९९ लाख २९,००० रुपये तर नगरपरिषद प्रांगणात सौर पथदिवे बसविण्याच्या कामात १ कोटी ३ लाख ७४ हजार रुपयांचा अपहार झाला आहे.
 
Top