उस्मानाबाद / प्रतिनिधी
कोविड -19 या रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरु आहे . सदर लॉकडाऊनमुळे राज्यातील दुधाच्या व दुग्धजन्य पदार्थाच्या मागणीत मोठया प्रमाणात घट झाली तसेच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधास योग्य भाव मिळत नसल्याने शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून 25 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करण्याबाबतची योजना दि . 27/04/2020 रोजीच्या शासननिर्णयान्वये कार्यान्वित केली मात्र सदर योजनेचा कालावधी दि . 31/05/2020 पर्यंत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीच्या काळात देखील दूध उत्पादक शेतकरी पशुपालन करीत आहेत, परंतू त्यांच्या दूधाला व योग्य भाव मिळत नाही तसेच खाजगी दूध संकलन करणाऱ्या संस्था कमी भावाने दूध खरेदी करतात. 25 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदीची योजना शासनाने बंद केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग संपुष्ठात येईपर्यंत शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून 25 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करण्याबाबतची योजना कार्यान्वित करावी, या योजनेंतर्गत उस्मानाबाद ( धाराशिव ) जिल्हयातील दूध उत्पादक शेतकऱ्याकडून शासनामार्फत प्रतिदिन 10 हजार लिटर दुधाची स्विकृती करण्यात येते. परंतू जिल्हयात मोठया प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी असल्याने प्रतिदिन 20 हजार लिटर दुध स्विकृती करुन जिल्हयातील व राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा.अशी मागणी उस्मानाबाद   लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची ईमेल व्दारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडे करण्यात आली.

 
Top