उस्मानाबाद/प्रतिनिधी :- जिल्‍ह्याचे सरासरी लागवडीलायक क्षेत्र  6 लाख 74 हजार 193 हेक्‍टर इतके आहे. त्‍यापैकी खरीप पिकाचे क्षेत्र 4 लाख 01 हजार 368 हेक्‍टर इतके आहे. सन 2020-21 मधील खरीप हंगामासाठी  5 लाख 51 हजार 800 हेक्‍टर इतके क्षेत्र प्रस्‍तावित करण्‍यात आलेले आहे. जिल्‍ह्यामध्‍ये सोयाबीन हे मुख्‍य पिक असून या हंगामासाठी  3 लाख 38 हजार 800 हेक्‍टर क्षेत्र प्रस्‍तावित करण्‍यात आलेले आहे.
खरीप हंगामासाठी 1 लाख 852  क्विंटल बियाण्‍याची गरज असून 1 लाख 8 हजार 401  क्विंटल बियाण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. त्‍यापैकी सार्वजनिक (महाबीज व राष्‍ट्रीय बीज निगम ) 67 हजार 881 क्विंटल व खाजगी कंपनी मार्फत 40  हजार 520 क्विंटल बियाण्‍याचा  पुरवठा  करण्याचे नियोजन करण्‍यात आलेले  आहे. आज अखेरपर्यंत सार्वजनिक व खाजगी कंपनीमार्फत 29 हजार 201 क्विंटल पुरवठा झालेला आहे. हंगामात बियाण्‍याचा तुटवडा भासणार नाही. तसेच जिल्‍ह्यामध्‍ये सोयाबीन हे मुख्य पीक असल्‍याने शेतकरी अधिकाधिक घरचे बियाणे वापरतात. या घरगुती बियाणाचा वापर करताना बियाण्‍याची उगवण शक्‍ती तपासून व बीज प्रक्रिया करुनच बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्‍यात येत आहे.
खरीप हंगामासाठी  रासायनिक खताची  मागणी 98 हजार 245  मेट्रीक टन नोंदविण्‍यात आलेली होती. त्‍याअनुषंगाने 62 हजार 650 मेट्रीक टन मंजूर करण्‍यात आलेला आहे. आज रोजी 45 हजार 502 मेट्रीक टन खत उपलब्‍ध झाले आहे. त्यापैकी 9 हजार 316 मेट्रीक टन खताची विक्री झालेली आहे. येत्‍या हंगामामध्‍ये खताची टंचाई भासणार नाही.   शेतकऱ्यांच्या  बांधावर खते व बियाणे पुरवठा करण्‍याच्‍या अनुषंगाने आजपर्यंत 1144 गटांमार्फत 2028.80 मेट्रीक टन खते व 1292.80  क्विंटल बियाणे 6619  शेतकऱ्यांच्‍या बांधावर वाटप करण्‍यात आले आहे.शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे या मोहीमेच्‍या अनुषंगाने आजपर्यंत 241 कृषि सहायकांमार्फत जिल्‍ह्यातील सर्व गावांमध्‍ये एकूण 1789 उगवण क्षमता प्रात्‍यक्षिके घेण्‍यात आलेली आहेत व प्रात्यक्षिक घेण्याची कार्यवाही सुरु आहे.येत्या खरीप हंगामामध्ये कृषि विदयापीठामार्फत विकसित केलेल्या बी.बी.एफ. म्हणजेच रुंदवरंबा सरी पध्‍दतीचे अनेक फायदे ( उत्पादन वाढ, हेक्टरी बियाण्याची मात्रा कमी, अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा निचारा होण्यास मदत, हवा व जमिनीतील ओलावा यांचे प्रमाण योग्य राखण्यास मदत इ.)   विचारात घेवून  व तंत्रज्ञानाचा वापर करुन सोयाबीन पिकाची लागवड करावी, असे आवाहन शेतकरी बांधवांना  कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके गावोगावी घेण्याची कार्यवाही सुरु आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागामार्फत  सोशल मिडीयाच्या माध्यमातून (जसे फेसबुक , झुम ॲप, व्हाटसअप इ. )  जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत खरीप हंगामाच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती पोहचविली जात आहे.येत्‍या खरीप हंगामात उत्‍पादन वाढविण्यासाठी शेतकरी बांधवानी कृषि विभागामार्फत वेळोवेळी केलेल्‍या मार्गदर्शनानुसार तसेच कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर योग्‍य ती दक्षता घेवून येणाऱ्या खरीप हंगामास सामोरे जावे, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने केले आहे.
 
Top