उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यामध्ये कोविड-19 आजाराच्या तपासणीसाठी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्र स्थापित करण्यासाठी आवश्यक विविध उपकरणे व साहित्य खरेदीसाठी लागणाऱ्या निधीकरीता जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी स्वंयस्फूर्तीने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यावतीने व याबाबत स्थापन करण्यात आलेल्या सर्व समितीच्या वतीने करण्यात आले होते.या आवाहनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपल्या कंपनीकडून सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून तसेच जिल्ह्यातील जनतेला होणारा कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत, देणगी म्हणून
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स लि. या कंपनीने 15 लाख 22 हजार 200 रुपये एवढ्या किंमतीचे अँटोमेटेड न्युक्लिक अॅसीड एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम व सोलापूर येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि. यांच्यावतीने 3 लाख 3 हजार 928 रुपये किंमतीचे रेफ्रीजरेटेड मायक्रोफ्यूज हे मशीन खरेदी करुन दिली आहे. या दोन्ही मशीन्स डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र, उस्मानाबाद येथे दाखल झालेल्या आहेत.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रात 17 ते 18 लाख रुपये खर्च करुन सर्व सोयींनी युक्त सुसज्ज लॅबची निर्मिती करण्यात आलेली आहे. उर्वरित मशीन्सचे शिपींग झालेले असून दोन आठवड्यात उस्मानाबाद येथे पोहोचतील. त्यानंतर आवश्यक सर्व मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण करुन तात्काळ टेस्टींग लॅबची सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध संस्था, बँका, सहकारी संस्था, कारखाने यांनी केलेल्या मदतनिधीतून जिल्ह्यात टेस्टींग लॅब उभारणी करण्यात येत असल्याने जिल्ह्यात उद्भवलेल्या कोविड-19 या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी, तसेच भविष्यात विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदा होणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.
 
Top