
तब्बल दीड महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर एसटीची बससेवा उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारपासून (दि. ११) सुरु झाली. जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये असल्याने ही जिल्हांतर्गत बससेवा १७ मे पर्यंत सुरु राहील.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी शुक्रवारी ही सेवा सुरु करण्याचे आदेश दिले होते. उस्मानाबाद जवळचे लातूर आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याने खबरदार व दक्षता घेत, नियम, अटी, शर्थींस अधीन राहून ही सेवा एसटीने सुरु केली आहे. सध्या केवळ १० मार्गांवर फेर्या सुरु केल्या आहेत. यात उमरगा, परंडा, कळंब, तुळजापूर, पाथरुड, भूम अशा काही मोजक्याच मार्गांचा समावेश आहे. प्रत्येक आसनावर एक प्रवासी या पध्दतीने प्रवाशांची बैठक व्यवस्था असेल. आजपासून वापरात आलेल्या सर्व बसगाड्या निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. जिल्हांतर्गत अडकून पडलेल्या प्रवाशांची यामुळे सोय झाली आहे.