उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांची असलेली कमतरता व भविष्यातील गरज लक्षात घेऊन नागरिकांना उपचारासाठी अद्ययावत सुविधा मिळाव्यात यासाठी तुळजापूर नगरपरिषदेने टर्शरी केअर सेवांसाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी पुढाकार घ्यावा व त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री मंदिर संस्थान, सी.एस.आर व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून उपलब्ध करावी व ६ महिन्यांत हे रुग्णालय सुरू व्हावं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी बुधवारी तुळजापूर नगरपरिषदेच्या कारभाऱ्यांना दिल्या.
आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दि.१६/०४/२०२० रोजी तुळजापूर च्या नगरसेवकांची ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून बैठक घेऊन तुळजापुर तालुक्यात अद्दयावत मल्टीस्पेशालीटी दवाखाना नसल्यामुळे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नगर परीषद, तुळजापुर ने अशी आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यावर प्राधान्याने लक्ष दयावे व त्यासाठी शहरात असलेल्या इमारतींपैकी योग्य इमारतीचा शोध घेणेबाबत सुचित केले होते. या अनुषंगाने नगराध्यक्ष, तुळजापुर, तहसीलदार व न.प.मुख्याधिकारी यांनी ‘यात्रा मैदान, भक्तनिवास’ ही भव्य व अनेक वर्षांपासून कोणत्याही वापरात नसलेली इमारत यासाठी निश्चित केली होती. त्याला अनुसरून आ.पाटील यांनी काल दि.२० मे रोजी पाहणी केली यावेळी, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तुळजापूरचे तहसीलदार श्री.तांदळे, मुख्याधिकारी श्री.लोकरे, नगरसेवक विशाल रोचकरी, अभिजित कदम, आनंद कंदले आदी उपस्थित होते.
सदरहु इमारतीमध्ये एकुण १४४ हॉलसह रुम आहेत, त्यापैकी बहुतांश रुमला अटॅच संडास-बाथरुमची सोय असुन पार्कींगची भव्य व्यवस्था आहे. इमारतीची पाहणी केल्यानंतर आ.पाटील यांनी या अनुषंगाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली असता त्यांनी सदर इमारतिची थोडीफार डागडुजी केली तर येथे  १०० खाटांचा अद्दयावत दवाखाना उभारला जाऊ शकतो असा अभिप्राय दिला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजभाऊ गलांडे यांना देखील सदर इमारतीची पाहणी करून अभिप्राय कळवण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांनी आज पाहणी केली व मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी सदर इमारत अत्यंत योग्य असल्याचे कळवले आहे.
यावेळी आ.पाटील यांनी या नियोजित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय रोगनिदान करण्यासाठी सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. यासारख्या उच्च दर्जाच्या अत्याधुनिक उपकरणांनी युक्त असावे तसेच यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, सी.एस.आर. फंड तसेच दानशुर व्यक्तींच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येतील व आपण स्वतः ५० लाखांच्या उपकरणं उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. सदर रुग्णालयास महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे नांव देण्यात यावे अशी सूचना देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांची असलेली कमतरता व या क्षेत्राकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी हे नियोजित रुग्णालय हे टर्शरी केअर सेंटर बनवण्याचा आपला मानस असल्याचे आ.पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी आपण सोलापूर येथील विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून या नियोजित मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात सेवा देण्याबाबत विनंती केली असता त्यांनी आठवड्यातील एक दिवस देण्याची तयारी दर्शवली असल्याचे आ.पाटील यांनी माहिती दिली. नगर परीषदने या विषयाचे गांभीर्य व महत्व ओळखून येत्या ६ महिन्यांत हे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू व्हावे यासाठी आवश्यक त्या उपययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या.
रुग्णालय उभे करण्यासाठी युद्धपातळीवर  प्रयत्न करा 
“येत्या ६ महिन्यांत  हे रुग्णालय उभारण्याचे निर्देश आ.पाटील यांनी बैठकीत दिले. या नियोजित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध आहोत व आपण स्वतः ५० लाखांची उपकरणं उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असून मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणी हा मोठा विषय असल्याने याकामी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून सर्व अभिनिवेश बाजूला सारून सर्वांनी यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.”
 
Top