उस्मानाबाद /प्रतिनिधी-
लॉकडाऊनच्या मागील ५१ दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील छोटे व्ययसायिक, पारंपारिक व्यवसाय करणारे, चहा स्टॉल, टपरीधारक, वाहतूक व्यवसाय करणारे खाजगी वाहन चालक, रिक्षाचालक, सलूनधारक, चौपाटीवरील भेळ विक्रेते, फेरीवाले, तांत्रिक दुरुस्त्या करणारे टेक्निशियन तसेच दैनंदिन उत्पन्नावरच ज्यांचे जीवनमान अवलंबून आहे, असे अनेक घटक या कालावधीत प्रचंड अडचणीत सापडले आहेत़
मुळातच उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळप्रवण क्षेत्रात मोडतो, मोठे उद्योग नसल्याने रोजगारांची वानवा आहे़, परिणामी, अनेकजण छोटे-मोठे व्यवसाय, कामे करुन आपला उदरनिर्वाह भागवितात़ अत्यंत तोकड्या भांडवलावर उपरोल्लेखित घटक हे व्यवसाय करीत असल्याने त्यांना मिळणारे उत्पन्नही तुटपुंजे असून, त्यातूनच ते आपल्या गरजा भागवीत असतात़ अशातच लॉकडाऊनमुळे व्यवसायही थंडावल्याने हे घटक आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ गरजा भागविण्यासाठी व्यवसायातील भांडवलच खर्ची गेल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत़ आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर किंबहुणा ते उठविल्यानंतर या घटकांना आपला व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यासाठी भांडवलाची गरज भासणार आहे़ तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील या मर्यादित गरजांमध्ये जगनाऱ्या सर्वसामान्य घटकांना, बचत गटाच्या माध्यमातून कामे करणाऱ्या महिलांना सरकारच्या माध्यमातून आपण भांडवल उपलब्ध करुन द्यावे, त्यासाठी तातडीने स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावे,  अशी मागणी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पत्राद्वारे केली आहे.
 
Top