उस्मानाबाद /प्रतिनिधी-
घ्ररकाम करणार्‍या अत्यंत विश्वासू महिलेने शहरातील नामांकित डॉक्टरला तब्बल १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनीही अत्यंत गेापनीय पध्दतीने तपास करुन अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शहरातील प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आदिनाथ राजगुरु यांचे अक्षय हॉस्पिटल सांजारोड परिसरात आहे. खाली दवाखाना व वरच्या मजल्यावर डॉक्टरांचे निवासस्थान आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत डॉक्टरांनी घरातील कापाटात वेळोवेळी ठेवलेल्या रकमेचा ताळमेळ घातला असता १५ लाख रुपये कमी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांनी याबाबतची फिर्याद आनंदननगर पोलिस ठाण्यात दिली. या रकमेवर अचानक कोणी डल्ला मारलेला नसून थोडीथोडी रक्कम गायब केली असावी, त्यामुळेच ते लक्षात यायला उशीर लागला हे हेरुन पोलिसांनी गुन्ह्याचा तपास अतिशय संयमी व गोपनीय पध्दतीने सुरु केला. ३० एप्रिलरोजी गुन्हाही दाखल झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या घरात अनेक वर्षांपासून एक महिला घरकामासाठी आहे. ती महिला अचानक दीड महिन्यांपूर्वी काम सोडून गेली असल्याचे पोलिसांनी हेरले. त्यानंतर त्या महिलेचा माग काढत पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. दररेाज घरकाम करत असताना सर्वांची नजर चुकवून ती ड्रॉवरमधून तिजोरीच्या किल्ल्या घ्यायची व दररोज थोडी थोडी रक्कम लंपास करायची. ही रक्कम ती परिचयातील एका पुरुषाकडे ठेवायला द्यायची. त्यातून त्यांनी ४ लाख ९० हजार रुपयांची आलिशान कारही खरेदी केली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १० लाखांची रोकड तसेच कार हस्तगत केली आहे.
पोलिस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, पोलिस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्यासह संदीप साबळे, अशोक ढगारे, विशाल कांबळे, सचिन खंडेराव यांनी तपास केला.
 
Top