काटी /प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसह जगभरातील बलाढ्य देश सुध्दा या रोगामुळे हतबल झाले आहेत.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे गोरगरीब लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला  आहे. अशा कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मदरसा दावतुल उलूम बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या सर्व शाखा आणि साराह हायस्कुल व काँलेज उस्मानाबाद, तसेच काटी मदरसा व काक्रंबा मदरसा पुढे सरसावली असून आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून सात हजार किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले असून रमजान पुर्वी 24 मे पर्यंत दहा हजार किटचा टप्पा पूर्ण करणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव पैगंबर जिलानी काझी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. तसेच या संस्थेच्या माध्यमातून सॅनिटायझर व मास्कचेही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येत आहे.
 या संस्थेच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यात दहा हजार गरजू कुटूंबाना किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्याचा संकल्प केला व या संकल्पनेनुसार 25 मार्च रोजी  उस्मानाबादचे पोलीस उपाअधिक्षक मोतीचंद राठोड आणि पोलीस उपाधीक्षक तुळजापुर टिपरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) येथे या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते गरजू कुटूंबियांना किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या किराणा साहित्याच्या किटचे संपूर्ण पॅकिंग तुळजापूर तालुक्यातील मसाला (खुर्द) येथे होत असून या कामात पंधरा ते वीस लोक विना मोबदला दिवसरात्र झटत आहेत. उस्मानाबाद शहरात उस्मानाबादचे पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे व पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते किराणा साहित्य सॅनिटायझर व मास्कचे
वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील जवळगाव येथे वैराग पोलीस स्टेशनचे सपोनि गोपाळ गोलव्हे यांच्या हस्ते गरजूंना किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. तर उस्मानाबाद तालुक्यातील अंबेहोळ येथे नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे उस्मानाबाद यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आजपर्यंत उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यासह जिल्हाभरात सात हजार किटचे वाटप झाले असून रमजान सणापुर्वी आपले दहा हजार किटचे उदिष्ट पुर्ण करणार असून उर्वरित किटच्या पॅकिंग पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
  सामाजिक बांधिलकीतून मदरसा दावतुल उलूम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या या उपक्रमाचे जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.
  या उपक्रमात उस्मानाबादचे तहसिलदार माळी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, पदाधिकारी यांनी मोलाची साथ दिली‌. या उपक्रमासाठी मदरसा दावतुल उलूम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेख रसूल, शेख अलिम वजीर, संस्थेचे सचिव पैगंबर जिलानी काझी,  सदस्य नबी शेख, महाराष्ट्र उर्दू-हिंदी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष बाबा फैजोद्दीन शेख, उस्मानाबाद येथील आयकर  विभागांमधील कर सल्लागार  शेख लतीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मसुद शेख, उस्मानाबाद रिपोर्टरचे संपादक आसेम काझी व गाझी ग्रुपचे तरुण परिश्रम घेत आहेत.
 
Top