उस्मानाबाद / प्रतिनिधी:-
 शेतकऱ्यांना बी-बियाणे व खत खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणे खर्चिक असते. त्याबरोबरच त्यांचा वेळ देखील वाया जातो , या दगदगीतून त्यांची सुटका करण्यासाठी बांधावरच बी- बियाणे व खत पोहोच करण्याची मोहीम लोहारा कृषी विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली असून दि. १५ मे रोजी तालुक्यातील आष्टाकासार  येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
सोयाबीन बियाणे व खत पोच मोहिमेचा शुभारंभ उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर , तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडवाल, कृषी तथा गट विकास अधिकारी अशोक काळे व महाबीजचे क्षेत्रीय अधिकारी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला.  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर थेट बांधावर कृषी निविष्ठा विक्रीमुळे कृषी विभाग शेतकरी, ग्राहक व कृषी सेवा केंद्र यांच्यामध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
लोहारा तालुक्यात २९ हजार शेतकरी असून आत्मा योजनेंतर्गत ६५८ शेतकरी गट कार्यरत आहेत. त्यापैकी साई समर्थ शेतकरी गट, आदर्श शेतकरी गट व विघ्नहर्ता शेतकरी गट या  शेतकरी गटांनी बी- बियाणे व खत खरेदी करून सोयीनुसार शेतकऱ्यांना वाटप केले.
यावेळी कृषी सहाय्यक सचिन पवार, मुकेश मुळे, धनराज कुडकले, जयंत अष्टेकर, रवि शिदोरे ,प्रवीण चिंचनसुरे, बालाजी कोरे ,संजय व्हर्टे, योगीराज कुडकले, करबस शिदोरे, स्वामीनाथ आळंगे, महादेव आळंगे, ज्ञानेश्वर इंगळे, दयानंद शिदोरे, सदानंद कोरे, राजेंद्र पवार व कृषी मित्र पिंटू मदने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top