उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 जीवनावश्यक वस्तूंची दुकाने एक दिवस आड सुरु ठेवण्याच्या विचित्र निर्णयामुळे बुधवारी (दि. ६) उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात अभूतपूर्व गर्दी उसळली, त्यातच इतर बाजारपेठही खुली केल्याने रस्त्यांवर जत्रा भरल्यासारखे चित्र होते. याचे परिणाम वाहतूक कोंडीत झाले. परिणामी पोलिसांवर मोठा ताण आला.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पूर्वी सकाळी सात ते ११ या वेळेत सुरु असणारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ८ ते १ या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश दिले. त्यातच ही दुकाने केवळ सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीनच दिवस सुरु राहतील हेही स्पष्ट केल्याने वाजारपेठेतच गोंधळ उडाला आहे. उद्या दुकाने बंद असणार या भावनेने नागरिक आजच म्हणजे सोमवार, बुधवारी व शुक्रवारी या दिवशी गर्दी करु लागले आहेत.
ठरावित पाच तासांसाठी बाजारपेठ उघडी ठेवल्याने नागरिकांचा लोंढा शहराकडे वळू लागला आहे. सोमवारी असेच चित्र होते. तर बुधवारी त्याहीपक्षा भयंकर चित्र उस्मानाबाद शहरात होते. सकाळी आठपासून शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले. त्यानंतर १० वाजता इतर दुकाने सुरु झाली. त्यामुळे जत्रा भरल्यासारखे चित्र शहरभर दिसू लागले. भाजीपाला, किराणा खरेदीसाठी संबंधित दुकानांसमोर भल्या मोठ्या रांगा लागल्या. इथे फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडाला.
गर्दी आवरताना व्यापार्याच्याही नाकी नऊ आले. प्रशासनाकडून चुकीच्या पध्दतीने आदेश काढले जात असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या अगोदरच केला आहे. वाजारपठेते एकाच वेळेत गर्दी होण्यापेक्षा ती विकेंद्रीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.


 
Top