परंडा/ प्रतिनिधी 
परांडा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी कृषी विभाग व रिलायन्स फाउंडेशन यांच्या वतीने ऑडिओ कॉन्फरंसचे 3 टप्प्यात नियोजन करून 4 था टप्पा दि.26 रोजी मंगळवारी करण्यात येत आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थीतीमध्ये शेतकरी किंवा शासकिय कर्मचारी यांना प्रत्यक्ष भेटणे किंवा मार्गदर्शन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. अशा परिस्थीतीमध्ये शेतकऱ्यांना शासकिय योजना व खरिप हंगामातील पिकांचे आयोजन या विषयांवर ऑडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातुन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांना व कृषी मित्रांना या माध्यमातुन मार्गदर्शन करण्यात आले आहे. आगामी खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर कृषी निविष्ठा देण्याची योजना शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. या योजने विषयी ऑडिओ कॉन्फरंस द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. भरावयाची माहिती, बियाणे, खते व किटकनाशकांची निवड, कृषी सेवा केंद्रांची निवड, आवश्यक कागदपत्रे, शेतकरी गटांची जबाबदारी याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी श्री. कैलास देवकर व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. अमोल पाटील यांनी शंकांचे निरसण केले.
येत्या खरिप हंगामामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन किंवा कापुस पिकाची लागवड करताना काय काळजी घ्यावी तसेच पिक लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचवण्याचा उद्देशाने सुध्दा ऑडिओ कॉन्फरंसचे आयोजन करण्यात आले. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे प्राध्यापक श्री. अरुण गुट्टे यांनी सहभागी शेतकऱ्यांना वाणाची निवड, खत, किड व रोग व्यवस्थापन, पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाची निवड, शेतमाल विक्री, आंतरपिकाची निवड अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या हेतुने उस्मानाबाद जिल्ह्यात ऑडिओ कॉन्फरंसचे आयोजन करण्यात येत असल्याचे रिलायन्स फाऊंडेशनचे व्यव्स्थापक श्री. संदीप गुंजाटे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेती, हवामान, पशुधन व्यवस्थापन, रोजगार, शासकिय योजना या विषयी अधिक माहितीसाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या निशुल्क क्र. १८०० ४१९ ८८०० या क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास तज्ञ म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे प्राध्यापक श्री. अरुण गुट्टे, तालुका कृषी अधिकारी श्री. कैलास देवकर व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. अमोल पाटील हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
 
Top