उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी चोंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे शासनाच्यावतीने अभिवादन करण्यात यावे, अशी मागणी धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
यंदा लॉकडाऊनमुळे चोंडीत जयंतीसाठी लोकांना एकत्रित येता येणार नाही. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ किंवा अन्य शासकीय प्रतिनिधीने तिथे जावून अभिवादन करावे, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.
ढोणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, अखिल भारतातील आदर्श महिला राज्यकर्त्या, लोककल्याणकारी राज्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील चोंडीचा असल्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. 31 मे रोजी त्यांच्या जयंतीसाठी हजारो लोक चोंडीत येत असतात. पण तिथे राज्य शासनाच्यावतीने अभिवादनाचा कार्यक्रम होत नाही, हे महाराष्ट्राला भुषणावह नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या जन्मस्थऴी शासनाच्यावतीने साजरी केली जाते आणि तिथे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उपस्थित राहतात, त्याप्रमाणे चोंडीतही शासनाच्यावतीने अहिल्यादेवी जयंती होवून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहेत. गतवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना धनगर विवेक जाग्रती अभियानाच्यावताने निवेदन दिले होते.
यंदाची 31 मे रोजीची अहिल्यादेवी जयंती आठ दिवसांवर आली आहे. आपणा सर्वांवर कोविडचे मोठे संकट आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व घटक झटत आहेत. 31 मे पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे चोंडीत अहिल्यादेवी जयंतीसाठी लोक एकत्रित येवू शकणार नाहीत, हे स्पष्ट आहे. या परिस्थितीत शासनाने प्रातिनिधीक स्वरूपात जयंती साजरी करावी. तिथे शासकीय प्रतिनिधीने राज्यातील जनतेच्यावताने अहिल्यादेवींनी अभिवादन करावे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

 
Top