उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
 लोकडाऊनच्या काळात होलसेल किराणा व्यापाऱ्यांकडून कसलीही दरवाढ झालेली नसताना शहर व ग्रामीण भागातील दुकानदारांनी बेकायदेशीररीत्या दरवाढ केली आहे. लोकांच्या हाताला काम नाही, पगारी नाहीत आणि दुकानदारांकडून होणारी ही आर्थिक लूट सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतिमार्फत कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. ग्रामपंचायतींनी स्टिंग ऑपरेशन करून तसे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवणे गरजेचे आहेत, त्यानंतर दुकानदारांवर फौजदारी दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
‌उस्मानाबाद शहरातील किराणा दुकानदारांनी लोकडाऊन काळात होलसेल माल पुरवठा होत नसल्याचे व होलसेल किराणा व्यापाऱ्यांनीच दरवाढ केल्याचे खोटे कारण सांगून लूट सुरू केली आहे. शेंगदाणे, साखरेच्या प्रतिकिलो दरामागे चार रुपये, खाद्यतेलाच्या पाकिटामागे 10 ते 20 रुपये, पार्ले बिस्किटावर कुणी एक तर कुणी 2 रुपये दरवाढ करून विक्री करत आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील किराणा दुकानाच्या वेळा लोकडाऊन कालावधीत बदलण्यात आल्या आहेत. किराणा माल पुरवठा करणाऱ्या गाड्याही सुरू आहेत. मात्र लोकडाऊन हे किराणा दुकानदारांसाठी लुटीचे कारण ठरत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळीत किराणा दुकानांची संख्या मोठी आहे. बहुतांश दुकानांची नोंदणी नाही. गावातील एका होलसेल किराणा व्यापाऱ्यासह उस्मानाबाद आणि लातूर येथील व्यापाऱ्यांकडून माल दुकानदारांना पुरवला जातो. होलसेल किराणा व्यापाऱ्यांकडे चौकशी केली असता कसल्याही प्रकारची दरवाढ त्यांनी केली नसल्याचे समोर आले. मात्र त्यांचे नाव घेऊन किराणा दुकानदार निर्धारित किमतीनुसार वस्तू विक्री करण्याऐवजी मनमानी दरवाढ करून ग्राहकांना लुटू लागले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांची होणारी ही लूट थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
 
Top