उस्मानाबाद/ प्रतिनिधी 
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरात लॉकडाऊन आहे. यामुळे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती (१४ एप्रिल) घरातच राहून साजरी करावी. त्या दिवशी सलग अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन प्रबुद्ध इंजिनिअर्स ग्रुप, नागरिक सेवाभावी संस्था आणि क्रांतिवीर दत्तोबा भोसले प्रतिभा प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे केले आहे.
स्टे होम अँड स्टडी स्टे सेफ हा हॅशटॅग वापरून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरीच राहा, शारीरिक अंतर राखा आणि सुरक्षित राहा. या सुचनेचे तंतोतंत पालन करत बाबासाहेबांची जयंती साजरी करावयाची आहे. विद्वत्तेचे प्रतीक, ज्ञानाचे महामेरू, अभ्यासाचे व्यासंगी अशी अनेक बिरुदे असलेल्या प्रकांड पंडित बाबासाहेबांना त्याच पद्धतीने म्हणजे सलग अठरा तास अभ्यास करून अभिवादन करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
लॉकडाऊनचे पालन करत घरातूनच या आवाहनास प्रतिसाद द्यायचा आहे.
 बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात पुस्तकांसह डिजिटल पुस्तकांचंही वाचन लोकांना करता येणार आहे. यात सहभागी लोकांनी अभ्यास करतानाचे आपले सेल्फी फोटो संयोजकांच्या समाज माध्यमातील क्रमांकावर किंवा अकाउंटवर सेंड करावयाचे आहेत. यात नीटपणे वाचता येणाऱ्या लहान मुलांसह वयस्कही सहभागी होऊ शकतात. सहभागींना आकर्षक प्रशस्तीपत्र ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी, ‘ १८ तास अभ्यास कृती अभिवादन’ नावाचे एक फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. असे संयोजकांनी कळविले आहे.

 
Top