उस्मानाबाद/ उस्मानाबाद -
उमरगा येथील औद्योगिक वसाहतीत गेल्या 15 दिवसापासून रिलिफ सेंटरमध्ये राहणारे तेलंगणामधील 465 नागरिक गेल्या तीन दिवसात टप्प्या टप्प्याने पळून गेल्याने महसूल व पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. विशेष म्हणजे उमरगा येथे कोरोनाचे 3 रुग्ण सापडले असताना त्याच भागातून हे नागरिक गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
उमरगा येथे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर तालुक्याच्या सर्व सिमा सिल करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता मात्र तोया घटनेने फोल ठरला आहे. या घटनेनंतर पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आपले हात वर केले आहे. या घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. 28 मार्च रोजी तालुक्यातील कसगी येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हे तेलंगणामधील कामगार असलेले 465 नागरिक लॉकडाउनच्या काळात अडकले होते. त्यांना कर्नाटक पोलीस त्यांच्या सीमेत प्रवेश देत नव्हते.म्हणून शासनाच्या आदेशानुसार ह्या तेलंगणामधील सर्व 465 नागरिकाना उमरगा प्रशासनाने उमरगा औद्योगिक वसाहतीत रिलिफ सेंटर मध्ये ठेवले होते.ह्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा होता. त्यांना दररोज जेवण दिले जात होते. व राहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. तरी देखील 12 एप्रिल रोजी यातील 215 नागरिक तर 13 तारखेला अंदाजे 20 नागरिक पळून गेले. तर मंगळवारी 14 एप्रिल रोजी सकाळी 11 च्या दरम्यान तेथील उरलेले सर्वजण पळून गेले.
लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात या सर्व 465 नागरिकांना सांभाळण्याची जबाबदारी प्रशासनाची होती तरीदेखील हे सर्व बंदिस्त नागरिक (मजूर) पळून गेल्यामुळे प्रशासनाच्या कार्यतत्परतेबद्दल तसेच लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सापडलेले तीनही कोरोनाबाधीत रुग्ण हे उमरगा परिसरातील असताना उमरगा येथून अशाप्रकारे एवढ्या मोठ्या संख्येने बंदिस्त ठेवण्यात आलेले नागरिक (मजुर) पळुन जावेत? यास जबाबदार कोण? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे. जिल्हाधिकारी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई करतात ? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सिमेलगत उस्मानाबाद हद्दीत तलमोड, कसगी आणि डिग्गी येथे पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात असताना शिवाय कर्नाटक हद्दीतही पोलीस बंदोबस्त असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मजुर पळुन जावेत याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

 
Top