उस्मानाबाद/प्रतिनिधी –
केंद्र शासनाने जाहिर केल्यानुसार जिल्ह्यातील सर्व पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना मोफत गॅस मिळणार आहे. जिल्ह्यातील ९६ हजार २६१ लाभार्थींना याचा लाभ होणार आहे. वितरणाचे जिल्ह्यातील नियोजन पूर्ण केले आहे, अशी माहिती ओएमसीचे जिल्हा नोडल ऑफिसर नितीन खोत यांनी दिली.
आेएमसीचे जिल्हा नोडल ऑफिसर नितिन खोत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार   सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. देशात व राज्यातील सर्व नागरिकांना घरातच थांबण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. मात्र, गॅस सेवा अत्यावश्यक असल्यामुळे शासनाने गरिब कुटुंबातील असलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना तीन महिने मोफत गॅस देण्याचे जाहिर केले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.  यासाठी जिल्ह्यातील उज्ज्वला योजनेतील ९६ हजार २६१ इतक्या लाभार्थींच्या खात्यात अगोदर तीन सिलिंडरची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यातून गॅस खरेदी करता येणार आहे. 
गॅस मिळवण्यासाठी कोणत्याही लाभार्थींना गॅस गोडावून अथवा वितरकांच्या दुकानांमध्ये भेट देण्याची गरज नाही. त्यांनी केवळ  भारत पेट्रोलीयमचा ७७१८०१२३४५,  इंडियन ऑईल कंपनीचा ९६२३२२४३६५, हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ८८८८८२३४५६ या क्रमांकावर बुकिंग करावे लागणार आहे. संबंधित वितरण प्रतिनिधी घरपोच सेवा देतील. लाभार्थींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.

 
Top