खातेदारांच्या जीवाशी खेळ ; तोंडाला मास्क नसल्याने  डॉक्टरही हादरले
वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी केले समुपदेशन 
बेंबळीत एमजीबी मॅनेजरचा मुजोरपणा, कर्मचाऱ्यांकडूनही सोशल डिस्टनिंगचे उल्लंघन

 उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शाखा व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे सोशल डिस्टनिंगचा बोजवारा उडाला. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार अनुदान वाटपाला हरताळ फासण्यात आल्यामुळे बँकेच्या आवारात मोठी गर्दी झाली. गर्दी पाहून घाम फुटलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच तसदी घेऊन शाखा व्यवस्थापकांचे समुपदेशन करावे लागले.
बेंबळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बुधवारी सोशल डिस्टनिंगचा मोठा बोजवारा उडाला. केंद्र शासनाने जनधन खात्यात प्रत्येकी ५०० रुपये अनुदान जमा केले आहे. अनुदान काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मोठी झुंबड उडत आहे. बुधवारीही अशीच गर्दी झाली होती. मात्र, बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडून कोणत्याही प्रकारची दक्षता घेण्यात आलेली नव्हती. यामुळे अत्यंत असुरक्षितपणे गर्दी जमा झाली होती. ही गर्दी पाहून बेंबळी दक्षता समितीचे सदस्य रणजित बरडे, अमर कटके, गोविंद पाटील,  आतिक सय्यद, नितिन खापरे हादरून गेले.
हा प्रकार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी यांनाही समजला. या सर्वांनीच बँकेतील कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शाखा व्यवस्थापकांनी बाहेर काही कर्मचाऱ्यांना पाठवले. कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात योग्य दक्षता घेण्याचे सोडून हा प्रकार  निदर्शनास आणणाऱ्यांसोबतच हुज्जत घातली. बाहेर गोंधळाची परिस्थिती सुरू असतानाही शाखा व्यवस्थापक खुर्ची सोडून बाहेर आल्या नाहीत. बँकेत सुरुवातीपासून बसलेले कर्मचाऱ्यांचे मित्र बाहेर आले.‌ त्यांनीही कर्मचाऱ्यांना साथ देत दक्षता समितीच्या सदस्यांसोबत हुज्जत घालण्यास सुरूवात केली. दरम्यान, हा प्रकार पोलिसांना समजल्यावर पोलिस आले. पोलिसांनी गर्दी पांगवून सोशल डिस्टनिंगसाठी सूचना दिल्या. दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले. त्यावेळी व्यवस्थापकांनी तोंडाला मास्क लावला नसल्याचे आढळून आले. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बँकेतील कर्मचारी किती दक्षता घेतात, हेच दिसून आले. यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनाही याप्रकाराचा अचंबा वाटला.
 खातेनिहाय वाटपाकडे दूर्लक्ष
वास्तविक पहाता केंद्र शासनानेच दररोज कोणता खातेक्रमांक असलेल्या व्यक्तीला कधी पैसे वितरीत करायचे, याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. याकडेही दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे नियोजनाचा तक्ता बँकेच्या आतील बाजूला चिकटवण्यात आला आहे. यामुळे खातेदारांना याची माहिती होत नाही. तसेच बँकेच्या समोर चौकोणही आखण्यात आलेले नाहीत.

प्रतिक्रिया
आम्ही सोशल डिस्टनिंगचे पालन करत आहोत. आपल्याला बोलत असतानाच आता मास्क काढला होता. आमच्याकडे सॅनेटायझर आहेत. याचाही उपयोग करत आहोत. खातेदारांना सोशल डिस्टनिंगचे महत्व सांगितले जात आहे.
- रेणूका नागणे, शाखा व्यवस्थापक
 
Top