
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
- जिल्ह्यात दोन दिवस पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून दंडूक्याचा चोप देखील देण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासनाला काही अंशी यश आल्याचे दिसून आले .
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दोन दिवस जनता कर्फ्यू लावलेला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या व्हायरसचा फैलाव होऊ नये , त्याबरोबरच ज्यांना होम कॉरंन्टाईनमध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्यांनी देखील कोणाच्या संपर्कात येऊ नये ,जनतेमध्ये मिसळू नये , जिल्ह्या बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून आवश्यक तो औषधोपचार करण्याबरोबरच पूर्व काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही हे तपासणी करण्याची यंत्रणा आरोग्य विभागाकडे नसल्यामुळे जिल्ह्यातील एकाही नागरिकाने शनिवार व रविवार असे दोन दिवस घराबाहेर पडू नये असे आदेश देण्यात आलेले आहेत . जिल्हा पोलिस अधीक्षक राजरोशन तिलक यांनी देखील चोक पोलीस बंदोबस्त ठेऊन जिल्ह्यात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करू दिला नाही. या बंद दरम्यान सर्व व्यवहार कडकडीत बंद करण्यात आले होते . तर अनेक गावामध्ये स्वयंस्फूर्तीने तेथील नागरिकांनी आपल्या गावात बाहेरच्या व्यक्तीचा प्रवेश होऊ नये यासाठी रस्तेच पूर्णपणे सिल करून बंद केल्याचे चित्र संपूर्ण ग्रामीण भागात पाहावयास मिळाले .