उस्मानाबाद / प्रतिनिधी -
श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांचे वतीने होणारा लक्ष्मीनृसिंह नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला असल्याचे देवस्थानचे मुख्य विश्वस्त, पुजारी मंडळ, सरपंच, यात्रा कमिटी यांनी जाहीर केले आहे.
या उत्सवासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूरला येत असतात परंतु यावर्षी हा उत्सव होणार नसल्यामुळे भाविक भक्तांनी येथे न येता आपल्या घरीच राहून श्रींची पूजाअर्चा करावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानचे मुख्य विश्वस्त व उस्मानाबाद येथील रहिवासी रोटरी सेवा ट्रस्ट चे सचिव श्री. प्रमोद दंडवते यांनी केले आहे.
सालाबाद परंपरेप्रमाणे या वर्षी देखील  श्री लक्ष्मी नृसिंह जयंती नवरात्र उत्सव दिनांक 29 एप्रिल ते ८ मे या कालावधीत होणार होता.  परंतु सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे आणि संपूर्ण प्रशासन या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे.  सध्या ३ मे पर्यंत लॉकडाउन  घोषित केला आहे आणि त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी व या उत्सव काळात नृसिंह भक्तांची गर्दी होऊ नये यासाठी उत्सव रद्द करण्यात आला आहे.  नृसिंह जयंती नवरात्र उत्सवात राज्यासह परराज्यातून कुलदैवताची पूजाअर्चा करण्यासाठी भक्त येत असतात.  नृसिंह जयंती उत्सवातील भजन, भक्ती संगीत, प्रवचन, किर्तन, काल्याचे किर्तन, भव्य जंगी कुस्त्या असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.  तसेच देवस्थानचे अन्नछत्र पूर्णतः बंद राहील परगावाहून उत्सवासाठी भक्तांनी न येता घरी राहूनच पूजाअर्च्या व उपासना करावी असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, इंदापूर पोलिस स्टेशन यांना देण्यात आले आहे. यावेळी लक्ष्मीनृसिंह देवस्थानचे मुख्य विश्वस्त प्रमोद दंडवते, पुजारी मंडळाचे श्रीकांत दंडवते, लक्ष्मीकांत डिंगरे, सरपंच सौ. मंगल संतोष मोरे, उपसरपंच दत्तात्रय ताटे, पोलीस पाटील अभय वांकर पाटील, माजी सरपंच हनुमंत काळे, यात्रा कमिटीचे बाबुराव गव्हाणे, ह.भ.प. अंकुश रणखांबे महाराज या सर्वांनी फोनद्वारे चर्चा करून लक्ष्मी नृसिंह जयंती उत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
Top