उस्मानाबाद /प्रतिनिधी-
पालघर जिल्ह्यात दोन साधु व त्यांच्या वाहन चालकाची जमावाने पोलिसांच्या समक्ष काठ्यांनी मारुन हत्या केली. या मॉब लिचिंगच्या घटनेचा तीव्र निषेध करुन या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपी विरुध्द् कठोर कारवाई करण्यात यावी . घटनास्थळी उपस्थित असताना व साधुंनी संरक्षणाची याचना केली असताना त्यांना वाचविण्याचा प्रयत्न न करण्या-या पोलिसांना आरोपी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी  मागणी  भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर घटाना  १६ एप्रिल रोजी घडली. त्याची चित्रफित १९ एप्रिल रोजी समाजमाध्यमातून प्रसारीत झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आवाज उठवला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जाग आली. मुख्यमंत्री उध्द़व ठाकरे यांना या भयानक हत्याकांडाची सरकारी यंत्रणेकडुन तातडीने माहिती मिळाली असेलच. तथापि त्यांनी चार दिवसांनी दि. २० एप्रिल रोजी फेसबुकच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या राज्यात साधुंची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्द़व ठाकरे यांनी तातडीने स्वत: या घटनेची माहिती देऊन संबंधितांवर कारवाईची खबरदारी घेणे अपेक्षित होते. मा. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: चौकशी करेपर्यंत आणि विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवेपर्यंत मुख्यमंत्र्यांना याबाबत जनतेशी बोलावे वाटले नाही. याचा निषेध केला आहे.
या विषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी यापुर्वी राज्यात मॉब लिचिंगचे प्रकार घडले होते. सदर घटना गैरसमजातून घडली आणि केंद्रशासित प्रदेशात साधुंना रोखले असते तर असे घडले नसते. अशा सबबी सांगून पोलिसांच्या साक्षीने झालेले हे क्रुर हत्याकांड किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. अशा प्रकारे या हत्याकांडावर पांघरुण घालण्याच्या प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो.
राज्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरीष्ठ अधिका-याकडुन लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. लॉकडाऊनमुळे संचारबंदी असताना तसेच चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला आणि आता पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधुंचे हत्याकांड झाले. मुख्यमंत्री उध्द़व ठाकरे यांनी या घटनांबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन वरील घटनांची नि:पक्ष चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. ठाणे येथे तरुणाला मारहाण प्रकरणी नि:पक्ष चौकशीसाठी संबंधित मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा आम्ही पुनरुच्चार करतो.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी उपस्थित होते.
 
Top