उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलेले असल्यामूळे खासगी क्षेत्रातील सर्व कामे बंद आहेत.त्यामुळे अनेक मंजुराच्या हाताला काम उपलब्ध नाही. त्यामूळे जिल्हयातील मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (नरेगा) हमी योजनेच्या माध्यामातून जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.
 जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा ) ची आढावा बैठक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  नरेगाचे प्रभारी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मगरूळकर,जिल्हा जलसंधारण अधिकारी ए.ए.कांबळे,मृद व जलसंधारणचे उपअभियंता एम.डी आदटराव,रेशीम विस्तार अधिकारी एम.पी.बराट,नरेगाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस.ए.मारकड,आदीसह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.       
जिल्हाधिकारी  मुधोळ-मुंडे   म्हणाल्या की,  जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत  व इतर यंत्रणाच्या माध्यामातून नरेगाची वेगवेगळया प्रकारची 633 कामे सुरू असून त्यावर 5021 मजूर काम करीत आहेत.या कामामध्ये वैयक्तिक, सार्वजनिक  सिंचन विहिर,शेततळे,घरकुल,सार्वजनिक पाणीपुरवठा विहिर,फळबाग लागवड,वृक्षलागवड, रस्ता दुतर्फा,  रोप वाटीका, आदी कामाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हयात वैयक्तिक व अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण करण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे तुती लागवडीसाठी अंडीकुंज जवळच्या एजन्सीमार्फत उपलब्ध करून देण्याचे नियोजन रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्याचे सूचना दिल्या.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामाचा सेल्फ तयार असून, त्यांना ग्रामपंचायत येथे प्रसिध्दी देण्यात आलेली आहे. आगामी काळात तलावातील गाळ काढण्याबाबत व जलसंधारणाची कामे प्राधान्याने मनरेगामधून हाती घेण्यात येतील. याशिवाय आवश्यकतेप्रमाणे दवंडीचाही वापर केला जाणार आहे.
 या अनुषंगाने सर्व कार्यान्वयीन यंत्रणा यांनी तात्काळ ग्रामपंचायतनिहाय उपलब्ध सेल्फवरील  कामे सुरु करावीत.  त्या ठिकाणी कोव्हीड-19 (कोरोना) अनुषंगाने सोशिअल डिस्टन्सिंग व इतर बाबींचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

 
Top