प्रतिनिधी /कळंब -
राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये इतर दुसऱ्या  जिल्ह्यातील अनेक शिक्षक कार्यरत आहेत. सध्या राज्यातील सर्वच शाळा लॉकडाऊन मुळे बंद असल्याने व २ मे पासून शाळांना अधिकृत उन्हाळी सुट्ट्या लागणार असल्यामुळे   इतर जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांच्या स्व जिल्ह्यात जाण्यासाठी स्थलांतर परवानगी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री व संबधीत खात्याचे मंत्री यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.
 गेल्या ३५ दिवसापासून कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद आहेत, येत्या २ मे पासून राज्यातील सर्वच शाळांना अधिकृत रित्या उन्हाळी सुट्टी लागणार आहे, सुट्ट्या लागल्या नंतरही  लॉकडाऊन मुळे सर्व जिल्हा सीमा बंद केल्या असल्याने इतर दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना आपल्या स्व जिल्ह्यात स्थलांतर करता येणार नसल्यामुळे ते आपल्या गावापासून व कुटुंबापासून दूरच राहणार आहेत तरी राज्यातील जिल्हा परिषद, नगर पालिका, महा नगर पालिका व संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांना आपल्या नोकरीच्या कार्यरत जिल्ह्यातून त्यांच्या मुळ गाव असलेल्या  जिल्ह्यात स्थलांतर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, कोशाध्यक्ष जनार्धन निउन्गरे व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती  अनुराधा तकटे यांच्या सह्या आहेत.
 
Top