उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद  जिल्ह्यातील  गोरगरिब,  गरजूंना  आतापर्यंत   15213   जीवनावश्यक   वस्तूंच्या  कीटचे  वाटप  केल्याची  माहिती  अपर जिल्हाधिकारी   शिरीष   यादव   यांनी   दिली  आहे. 
कोरोना  रोगाच्या  प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत  संचारबंदी,  लॉकडाऊनमुळे  गरीब, मजूर यांना जीवनावश्यक साहित्य कमी पडू नये याची प्रशासन दक्षता घेत आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था, संघटना, बँका, साखर कारखाने, दानशूर व्यक्ती आदींच्या सहकार्याने ही मदत दिली जात असल्याचे श्री यादव यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी श्री यादव यांनी सांगितले, केंद्र व राज्य शासनाने कोरोना रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत संचारबंदी, लॉकडाऊन केला. त्यामुळे रोजंदारी करणारे मजूर, कामगार, गोरगरिब लोक यांची उपासमार होवू नये यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
 त्यानुसार अपर जिल्हाधिकारी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविधि संस्था, संघटना आदींना संपर्क साधून सहकार्याचे आवाहन केले. त्याला जिल्ह्यातन चांगला प्रतिसाद लाभल्याने आतापर्यंत 24355 जीवनावश्यक कीट उपलब्ध झाल्या आहे यामध्ये राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी तब्बल 5 हजार, श्री तुळजाभवानी देवस्थान 5 हजार, अंजुमन हेल्थकेअर सोसायटी 2700, उस्मानाबाद जनता सहकारी बँक 1 हजार, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय 778, खडी केंद्र संघटना 621, फटाका उद्योग तेरखेडा 600, बाजार समिती कळंब 500, भैरवनाथ दूध संघ  सोनारी 407, प्रविण रणबागुल (भूम) 300, शिवाजी कापसे (कळंब) 250, सलीम चाऊस (पोलीस निरीक्षक पुणे) 250, बाजार समिती मुरुम 201 , व्यापारी महासंघ उस्मानाबाद 200, सीना-कोळेगाव प्रकल्प कार्यालय 200, एमआयडीसी उस्मानाबाद 180 अशा 18187 कीट दानशूर मंडळींकडून जमा करण्यात यश आले आहे.
यामधून आतापर्यंत 15213 कीटचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये उस्मानाबाद 4399, तुळजापूर 1623, उमरगा 3683, लोहारा 1566, भूम 1164, परंडा 739, कळंब 1903, वाशी 136 कीटचा समावेश आहे. गरजूंच्या याद्या तयार करण्यात आल्या असून, आवश्यकतेनुसार वितरण करण्यात येत  असल्याचे श्री यादव यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून मदत घेवून गरजूंना देण्यात येणार आहे. लॉकडाऊन कालावधी वाढत असल्याने दानशूर मंडळींनी स्वयंस्फुर्तीने मदत करावी, यासाठी श्री रेड्डी यांच्याशी (9552557507) संपर्क करण्याचे आवाहनही श्री यादव यांनी केले आहे.
 
Top