उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कसबेतडवळे ते दुधगाव या गावांदरम्यान बुधवारी (दि.11) सकाळी १०.३० सुमारास भीषण अपघात झाला. एसटी बस व कंटेनरची धडक होऊन झालेल्या या अपघातात 18 जण जखमी झाले. यापैकी बसचालकासह चार जण गंभीर जखमी आहेत.
लातूर- कणकवली ही कणकवली आगाराची बस (एमएच 20 बीएल- 4082) लातूरवरून कणकवलीकडे निघाली होती. कसबेतडवळे येथील बसस्थानकावरुन थांबा घेऊन साधारपणे दोन किलोमीटर पुढे गेल्यावर पुणे येथून हैदराबादकडे फ्रिज घेऊन जात असलेला कंटेनर (एमएच 02 क्यु- 7908) समोरुन आला.
बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या धडकेने बसचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा होऊन बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे दहा फुट खड्डयात फिरुन अर्धवट अडकली. या बसमध्ये 30 प्रवाशी होते. यापैकी 17 प्रवाशी जखमी झाले. जखमीपैकी काहींना येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व काहींना उस्ममानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काही प्रवाशी आपपल्या सोयीप्रमाणे खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
या अपघातामध्ये बसचालक शेळके , कंटेनरचालक धनाजी साळुंखे, बसमधील प्रवाशी सोजरबाई लिंबराज सूर्यवंशी (वय 65), रेखा गणपत काळे (रा. कसबेतडवळे) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर रतन मरिबा कांबळे (वय 55, रा. विवेकानंदनगर, लातूर), नवनाथ अशोक कचरे (वय 39, रा.ममदापूर, ता. बार्शी), महादेव गेनबा घोळवे (वय 55, रा. घोळवेवाडी, ता. बार्शी), इम्रान रऊफ मनियार (वय 32, रा. तावरजा कॉलनी, लातूर), विशाल बाळासाहेब चव्हाण (वय 28, रा. कळाशी, ता. इंदापूर), श्रीमंत पद्मकुमार माहेरकर (वय 60, रा. हत्तेनगर, लातूर), सुरजपाशा अल्लाउद्दीन मुजावर (वय 40, रा. कसबेतडवळे, ता. उस्मानाबाद), शमा ताजोद्दिन शेख (वय 45, रा. कसबेतडवळे), हौसाबाई अंबादास कांबळे (वय 50), अंबादास कांबळे (वय 55, दोघेही रा. भंडारवाडी, ता. उस्मानाबाद), बाबासाहेब रोहिदास जानराव (बसवाहक, रा. पांगरी, ता. बार्शी), दत्ता भोसले (रा. सोनारी), अर्जुन सुतार (वय 42, रा. येडशी, ता. उस्मानाबाद) व अन्य तीन जण जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच ढोकी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश बनसोडे तत्काळ अपघातस्थळी पोलिस कर्मचा-यांसह दाखल झाले. तेथे आलेल्या 108 क्रक्रमांकाच्या रूग्णवाहिकेमधून जखमींना उपचारासाठी येडशी व उस्मानाबादला रवाना केले. या मार्गावर सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती.

 
Top