
सर्वत्र थैमान घालत असलेला कोरोना हा आजार सर्वत्र झपाट्याने पसरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी या आजारास न घाबरता त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यशवंतराव गडख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
या आजाराबाबत जिल्हयात कार्य उपाययोजना केल्या आहेत ? तसेच आगामी काळात कार्य खबरदारीचे उपाये घ्यावे लागतील ? या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य अधिका-यासमवेत आढावा घेण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. कैलास पाटील, आ.सुजितसिंह ठाकुर, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना गडाख म्हणाले की, दुस-या गावाहून येणा-या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागास देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्यास त्या व्यक्तींना या आजाराची लागन झाली आहे की, नाही ? याची दक्षता घेता येईल, त्या बरोबरच योग्य तो उपचार संबंधित व्यक्तींवर करणे आरोग्य विभागास सोईचे होईल, जिल्हयातील पर्यटनस्थळ असलेले नळदुर्ग येथील गडकोट किल्ला व तुळजाभवानी मंदिर हे बंद करण्यात आले असून नागरिकांनी इतरही सर्वाजनिक कार्यक्रम रद्द करावेत त्याचबरोबर लग्नसमारंभ देखील अगदी घरच्या-घरी कशापध्दतीने करता येतील, या दृष्टीने नियोजन करावे तसेच या बाबत जनजागृतीची गरज असून प्रशासनाच्या वतीने पोस्टर, जिंगल्स आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सजग केले आहे. जिल्हयातील व्यायामशाळा, क्रीडा संकुल, आठवडी बाजार व डिमार्ट आदी सर्व बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रेशन दुकानदारास देखील पोस्टर व जिंगल्स दर्शनी भागात डकवून जनजागृती करण्यासाठी सहभागी करून घेतले आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात ३० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू केले असून जिल्हयातील इतर तालुक्याच्या ठिकाणी १२ विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजापूर मंदिर बंद केले असून येरमाळा येथील येडाई उत्सव देखील रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाविकांनी देवदर्शन किंवा पर्यटनासाठी बाहेर पडू नये, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करून ते म्हणाले की, उघड्यावरील खाद्य पदार्थ, होणारी मांस विक्री याबाबत देखील दक्षता घेण्याच्या सूजना जिल्हाधिका-यांना केल्या असून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हात धुण्यासाठी वापरण्यात येणारे हॅन्डवॉश व मास्कचा तुडवडा भासवून मुळ किंमतीपेक्षा अतिरिक्त किंमत आकारणा-या दुकानावर कारवाई करण्याचे आदेश ही जिल्हा प्रशासनाला त्यांनी दिले.