उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 सामाजिक बांधिलकी जपत सर्वांनी दिव्यांग व्यक्ती साठी काम करुन जास्तीत जास्त लोकांनी दिव्यांगाचे दु:ख कमी कसे होईल याबाबत काम करुन सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन उस्मानाबाद, रत्ननिधी ट्रस्ट मुंबई, एकता फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत जयपूर फूट, हात व कॅलिपर स्क्रीनिंग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाँ. राजाभाऊ गलांडे, डॉ. धनंजय पाटील, तुळजाभवानी सहकारी रुग्णालय चे सचिव डॉ. हर्षल डंबळ, उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव, प्राचार्या मंदाकिनी शिंदे, रत्न निधी ट्रस्ट चे मनोज चौहाण, रामसुजन साकेत,एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जयपुर साहित्याची ज्यांना गरज आहे त्या बांधवांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा व दिव्यांग बांधवासोबत जिल्हा प्रशासन सदैव सोबत राहील अशी ग्वाही यावेळी शिरीष यादव यांनी दिली.
 दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असते अशा वेळी त्यांना शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज असते त्यावेळी  सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी केले.
दिव्यांग बांधवांना  सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत जिल्हा प्रशासन उस्मानाबाद व एकता फाऊंडेशन यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालय सर्व रुग्ण  सेवेसाठी सदैव तत्पर असेल असेही यावेळी डॉ. राजाभाऊ गलांडे बोलताना म्हणाले.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हे शिबीर होत असून जास्तीत जास्त दिव्यांगांनी या साहित्याचा फायदा  घेऊन आयोजकांना रुग्ण सेवा करण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा आभिलाष लोमटे यांनी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरीच्या  प्रतिमा पूजन करून व वृक्षाला पाणी देऊन झाली. मान्यवरांचे स्वागत शाल व गुलाबाचे झाड भेट देऊन करण्यात आली. यावेळी 90 दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णाना चहा व बिस्किटाची सोय करण्यात आली होती.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक जिल्हा नियोजन आधिकारी सोमनाथ रेड्डी, एकता फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विशाल थोरात, प्रसाद देशमुख, केदार लगदिवे, सीएम फेलो पंकज पाटील, नागेश राजुरे, आदित्य लगदिवे, कॉलेजचा स्टाफ व विद्याथ्र्यानी परिश्रम घेतले.
 
Top