उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जगभरात सध्या कोरोना विषाणूने चिंता वाढवली आहे. याचा प्रादुर्भाव भारतात विशेषता: महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याविरोधात लढाईसाठी तसेच आवश्यक उपाययोजनांसाठी कोणत्याही शासन आदेशाची वाट न पाहता उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी आपले एक दिवसाचे वेतन या कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मार्च महिन्याच्या वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची कपात करून थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे जमा करण्याची विनंती केली आहे.
कोरोना विषाणूने देशासह महाराष्ट्रातही आपला प्रादुर्भाव वाढवला आहे. यामुळे अनेक नागरिक बळी पडले असून बाधित नागरिकांचीही संख्या मोठी आहे.सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित येत या विषाणूला रोखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांकरीता कोणत्याही शासकीय आदेशाची वाट न पाहता आपले एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीव व कर्तव्य भावनेतून हा निर्णय घेतला असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, खासगी माध्यमाच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी त्यांच्या माहे मार्च २०२० या महिन्याच्या वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची कपात करून या संपूर्ण रकमेचा एकत्रित धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे जमा करण्याची विनंती केली आहे. यासाठी जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले असून यावर प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, प्राथमिक शिक्षक समितीचे बशीर तांबोळी, प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष कल्याण बेताळे, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस व्ही.जी.पवार, एकल शिक्षक सेवा मंचचे राज्य कोषाध्यक्ष पवन सूर्यवंशी, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे चंदन लांडगे, प्राथमिक शिक्षक संघाचे लक्ष्मण पडवळ, विक्रम पाटील, बिभिषण पाटील, राज्य शिक्षक परिषदेचे उमाकांत कुलकर्णी, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, अविनाश मोकाशे, विश्वास शिंदे, ए.बी.अवताडे, बालाजी इतबारे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे सचिव राजकुमार मेंढेकर, बापू शिंदे, उर्दू श तय्यबअली शहा, खमरुद्दीन सय्यद अशा विविध शिक्षक संघटनांच्या ३० प्रतिनिधींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
 
Top