उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयासह अधिनस्त असलेल्या उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामध्ये गुरुवारी (दि.19) दिवसभरात परदेशातून तसेच परगावाहून आलेल्या एकूण 65 रुग्णांची कोरोना कोविड-19 अंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी एकाही रुग्णाला कोरोनासंबंधी लक्षणे आढळून आलेली नसल्याचे आरोग्य प्रशासनाने कळविले आहे.
तपासणी करण्यात आलेल्या व अन्य प्रकारचा आजार असलेल्यांवर औषधोपचार करण्यात आले. संबंधित रुग्णांना कोरोना बाधितांचे लक्षणे आढळून न आल्यामुळे त्यांना त्यांच्या घरीच करण्यात आले असून, संबंधितांचे संपर्क क्रक्रमांक घेण्यात आले आहेत. त्यांना काही सर्दी, घश्यात खवखवणे, ताप इत्यादी करोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यास संबंधित नजिकच्या जिल्हा रुग्णालयातील नियंत्रण कक्षाला (संपर्क 02472-226927), उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ अवगत करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरुन न जाता परदेशातून इतर शहरातून प्रवास करुन आलेल्या आपल्या नातेवाइकांना त्यांची आरोग्य तपासणी नजीकच्या जिल्हा रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालयात किंवा ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी पाठवावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.व्ही. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे यांनी केले आहे.

 
Top