कळंब/प्रतिनिधी-
शेतक-यांनी पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींचा वाट न पाहता आपल्या गावात, गाव पातळीवर काम करणे आवश्यक आहे. बचत गटाच्या महिलांनी कर्जाची योग्य नियोजन करून त्याचा उपयोग  आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केला पाहिजे. शेतक-यांनी शेती पिकावर अवलंबून न राहता शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन या जोड  व्यवसायावर भर देऊन  गुंतवणूक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आयोजित भव्य राज्यस्तरीय पाच दिवसीय कृषी महोत्सवामध्ये समारोप प्रसंगी उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे बोलत होत्या.
  या पाच दिवसीय राज्यस्तरीय मांजरा कृषी महोत्सव मध्ये दि. 02 मार्च 2020 रोजी उद्घाटन समारंभ झाला. उद़्घाटनासाठी अशोक ढवण, कृषिरत्न बी.बी. ठोंबरे , भास्कर रावजी -पेरे पाटील (आदर्श सरपंच ग्रा.पं. पाटोदा.), डॉ. अशोकराव मोहेकर,  एन.पी. राजगुरू उपस्थित होते.  दि.03 मार्च रोजी भगवानराव कापसे यांनी गट शेती व फळबाग लागवड याविषयी मार्गदर्शन केले तसेच  नितीन मार्केट यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसायावर सांगितले तर नवनाथ कसपटे यांनी  सीताफळ लागवड विषयी सखोल मार्गदर्शन केले. 4 मार्च रोजी कृषिभूषण पांडुरंग आव्हाड यांनी ऊस पीक व पाणी व्यवस्थापन याविषयीचे सविस्तर अशी माहिती शेतक-यांना सांगितली. तर 05 मार्च रोजी वसंतरावजी मुंडे यांनी उस्मानाबाद शेळी पालन विषयी माहिती सांगितली तसेच शिवराज मेदने यांनी पाणी आडवा पाणी जिरवा याविषयीचे मार्गदर्शन शेतक-यांना केले.
 कार्यक्रमाच्या  समारोप प्रसंगी व्यासपीठावर उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे अध्यक्ष  होत्या. तर श्रीमती अहिल्या गाठाळ उपविभागीय अधिकारी, श्रीमती मंजुषा लटपटे- तहसीलदार कळंब,  हर्षद अंबुरें - अध्यक्ष रोटरी क्लब कळंब, सचिव डॉ. हनुमंत  चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.रामकृष्ण लोंढे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजय घुले, सूत्रसंचालन प्रतीक गायकवाड यांनी केले  तर आभार प्रदर्शन संजय देवडा यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे  सर्व  पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top