उमरगा/प्रतिनिधी-
घरातील भांडणाच्या किरकोळ कारणावरुन भाच्याने वडिलांच्या मदतीने मामाचा खून केल्याची घटना शहरातील मुळजरोड भागातील भारत नगरमध्ये शनिवारी (दि.22) रात्री घडली.
याबाबतची माहिती अशी की, डवरी गोसावी समाजातील लोक भारत नगर भागात रहातात. शिवाजी हरिश्चंद्र सावंत या मजूरी करणा-या व्यक्तीची एक बहिण पार्वती ही पती रामराव भानुदास साळूंके व मुलाबाळासह भारत नगर भागात रहाते. शिवाजीची दुसरी बहिण सकिना यांच्या घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम शनिवारी (दि.22) जळकोट येथे होता. तेथे दुपारी रामराव व शिवाजीचा लहान भाऊ सखाराम सावंत यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. शनिवारी रात्री साठेआठच्या सुमारास शहरातील भारत नगर येथे भांडणाचे स्वरूप सुरू झाले, यात रामराव याने अर्जुन हरिश्चंद्र सावंत (वय 28 वर्ष) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर जालिंदर रामराव साळूंके यांनी कपाळावर दगडाने जबर मारहाण केली. त्यात अर्जुनला जबर मार लागला. गंभीर जखमी अवस्थेतील अर्जुनला पहिल्यांदा खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अर्जुनला मयत घोषित केले.
या प्रकरणी शिवाजी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुनच्या खून प्रकरणी भाऊजी रामराव व भाच्चा जालिंदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बाप लेकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ करीत आहेत.

 
Top