उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा निर्माण केला असून राष्ट्रपती पासून ते गावच्या सरपंच पदावर देखील महिला जबाबदारीने काम करीत आहेत.  मुलगाच हवा या हट्टासाठी मुलीचा गर्भपात करू नका, कर्तबगार महिलाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलगी वाचवा,असे आवाहन  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हा रुग्णालय येथील परिचर्या प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित "बेटी बचाओ बेटी पढाओ" कार्यशाळेत समारोप प्रसंगी केले.
परिचर्या प्रशिक्षण केंद्र, उसमानाबाद येथे दि. 11 ते 14 फेब्रुवारी 2020दरम्यान "बेटी बचाओ बेटी पढाओ" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासापीठावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ डी.के.पाटील, उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, डॉ. सचिन बोडके, (नि.वै.अधिकारी बा.स.), क्ष किरणतज्ञ डॉ.अनिल चव्हाण, आयएमए चे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, फोग्झी अध्यक्ष डॉ. सुशील सरडे, वूमन विंग आयएमए च्या अध्यक्षा डॉ. मीना जिंतूरकर,  पीसीपीएनडीचे नोडल ऑफीसर डॉ.दत्तात्रय खुणे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.शैलजा मिटकरी, प्राचार्या मंदाकिनी शिंदे, श्री.अमर सपकाळ आदी उपस्थित होते.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, मुलींच्या जन्मदरात होत असलेली घट ही  भविष्यात समाजासाठी एक मोठी चिंतेची बाब आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.  समाजामधील मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलींचे जन्मदराचे प्रमाण अत्यंत कमी असून भविष्यात मुलं व मुली यांच्या संख्येत मोठी  दरी निर्माण होऊ शकते, ही समाजासाठी मोठी चिंतेची बाब आहे. अनधिकृतरीत्या गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात  गर्भपात होत आहेत, यामुळे मातेच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो. कोणत्याही औषधी दुकानदाराने गर्भपात होण्यासाठी वापरावयाच्या गोळ्यांची विक्री स्त्रीरोग तज्ञाच्या सल्ल्याशिवाय करू नये. जिल्हयामध्ये मुलींचे प्रमाण  एक हजार मुलामागे 930 मुली  असे आहे.  राष्ट्रपतीपासून ते गावच्या सरपंच पदावर देखील महिला जबाबदारीने काम करीत आहेत,असे सांगून सर्वांनी या मोहिमेसाठी सहकार्य करावे,असे आवाहन केले.
जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी कृती आराखडा तयार करून सतत पाठपुरावा चालू आहे. जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुरु आहे व ती तात्काळ पूर्ण होईल, वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यास सर्व अवघड शस्त्रक्रिया याच ठिकाणी होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत,असेही खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी यावेळी सांगितले.      
 या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील आशा कार्यकर्ती, गटप्रवर्तक, अंगणवाडी सुपरवायजर, कार्यकर्ती, मदतनीस, औषध विक्रेते, सोनोग्राफी सेंटर व एमटीपी सेंटरधारक डॉक्टर्स, स्त्री रोग तज्ञ, क्ष-किरण तज्ञ,  सर्व उप जिल्हा स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी  व खासगी सोनोग्राफी सेंटरधारक डॉक्टर्स, सर्व खासगी डॉक्टर्स उपस्थित होते.
जर कोणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान  करत असेल तर त्याची माहिती पीसीपीएनडीटी हेल्पलाईन 18002334475 या टोल फ्री नंबरवर अथवा www.amchimulgi.gov.in  या वेबसाईटवर माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन देखील या कार्यशाळेत करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष पोतदार व आभार डॉ.दत्तात्रय खुणे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महादेव शिनगारे, जयराम शिंदे , उमेश गोरे, गोरोबा खांडेकर, ज्योतिराम ओहाळ, शहाजी कदम, गणेश कुलकर्णी, सरफराज शेख आदींनी परिश्रम घेतले.
 
Top