उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट असताना तलमोड शिवारात टोलनाका सुरू करण्यात आला आहे. अर्धवट काम असताना टोलनाका सुरू करण्यासाठी दिलेल्या परवानगीचा मुद्दा पेटला असून राष्ट्रवादी काँग्रेससह विविध संघटनांनी या टोल नाक्याची परवानगी रद्द करावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर तलमोड येथील ग्रामस्थ व मोटार मालक संघटनेच्या पदाधिका-यासोबत ठेकेदार कंपनीच्या अधिका-यांची पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत प्रचंड घमासान झाले.
2 तारखेला उमरगा तालुक्यातील तलमोड येथे चौपदरीकरण केलेल्या ठेकेदार कंपनीने टोल वसुलीस प्रारंभ केला आहे. याबाबत त्यांना केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. पण या महामार्गाच्या चौपदरीकरणचे काम गेली सात वर्षांपासून चालू असून अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झालेले नसताना टोल वसुली का केली जात आहे याबाबत जनतेत मोठा रोष निर्माण झालेला असून विविध संघटना व राजकीय पक्षाकडून या टोल वसुलीला विरोध केला जात आहे.
उमरगा तालुक्यातील तलमोड येथील ग्रामस्थानी टोल नाका चालू करू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांनी तलमोड ग्रामस्थ व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची सोमवारी (दि.3) रोजी टोलनाक्यावर बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक वाहनांना टोल आकारु नये, शेतकऱ्यांच्या जमीनीचा राहिलेला मावेजा तात्काळ देण्यात यावा व स्थानिक भुमीपुत्राना कामावर सामावून घेण्याची मागणी केली. यावेळी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची मागणी धुडकावत कोणालाही टोल मधून सवलत देणार नाही असे सांगितल्याने ग्रामस्थ व ट्रक मालक यांनी आम्ही टोल देणार नाही अशी भूमिका घेतली यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी उदमले यांनी मध्यस्थी करून ठेकेदार कंपनीच्या अधिका-यांना ग्रामस्थांच्या मागण्या तुमच्या वरिष्ठांना कळवा असा सल्ला दिला. अखेर मागण्या ठेकेदार कंपनीच्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात कळवून येतील तोपर्यंत तलमोड येथील ट्रक मालकांना टोल घेतला जाणार नाही ही मागणी यावेळी उपस्थित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने वातावरण शांत झाले. यावेळी सोलापूर टोलवेज कंपनीचे ऑपरेशन मॅनेजर प्रकासलाल दास, काँग्रेसचे जिल्हा सचिव आश्लेष मोरे, तलमोड येथील मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष बालाजी मोरे, उपाध्यक्ष अमर पाटिल यांच्यासह शेकडो उपस्थित होते.
 
Top