उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्हा अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो. परिणामी जिल्ह्यातील जनतेला सातत्याने दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागते. मागील 7 वर्षापैकी 4 वर्षे सरसरीच्या 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. शेती हेच या भागातील जनतेच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे. निसर्गाच्या अवकृपेने वारंवार वाट्याला येणाऱ्या आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. जानेवारी 2019 पासून जिल्ह्यात 126 शेतक-यांनी हतबलतेतून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. त्यासाठी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा नॅशनल इन्फ्रा पाईपलाईन योजनेत समावेश करावा, अशी मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
उस्मानाबाद जिल्हयासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. सदर प्रकल्पाची किंमत रुपये 4845.05 कोटी असून यातील पहिल्या टप्यातील 7 टि.एम.सी. पाणी वापरासाठी रुपये 2349.10 कोटीचे काम ? दि.27.08.2009 च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेने चालु आहे. परंतू सध्यस्थितिला शासनाने आखून दिलेल्या प्रकल्पाच्या कामांच्या प्राधान्य क्रक्रमामध्ये लिंक-5, उध्दट बॅरेज, जेऊर बोगदा व उपसा टप्पा क्रं. 1 ची कामे पूर्ण करावीत असे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे टप्पा क्रक्रं. 2 अंतर्गत पांगरदरवाडी साठवण तलाव ते रामदरा साठवण तलाव ही कामे अद्याप बाकी आहेत.
   उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्णत्वाकडे जावा यासाठी "नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन" या योजनेत याचा समावेश होणे संयुक्तिक वाटते व तसे करण्यासाठी राज्य सरकारकडून सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणे गरजेचे आहे. या अनुषंगाने संबंधित अधिका-यांची बैठक बोलवण्यात यावी, त्यांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत व कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा "नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन" च्या 6500 प्रकल्पांमध्ये समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, ही उस्मानाबाद जिल्हावासियांच्या वतीने आग्रही मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
 
Top