उस्मानाबाद/प्रतिनिधी-
लेखन संस्कृती टिकण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे. पुस्तके माणसाला धैर्याने संकटाला समोरे जाण्यासाठी शिकवत असतात, असे मत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
आमदार वसंत काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पळसप येथील ग्रामिण साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी रात्री उशिरा झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बनसोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष दत्ता भगत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मधू सावंत, स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, प्राचार्या शुभांगी काळे, माजी कुलगुरु डॉ. मधुकर गायकवाड, अनिल काळे, प्रा. अंकुश नाडे, प्राचार्य डॉ. हरीदास फेरे, बालाजी तांबे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, भावनांची संवेदनशिलता जाणणरे साहित्य असते. सकस साहित्य लोकशाहीला समृध्द करते. कोणी काळजावर तर कोणी कागदावर लेखन करतो. ही लेखन संस्कृती टिकण्यासाठी प्रयत्न सर्वच स्तरावरून होणे आवश्यक आहेत. समृद्ध लेखनशैलीची जपवणूक होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नवयुवक, महाविद्यालयिन युवकांसाठी लेखन कार्यशाळा निर्माण करण्याची गरज आहे.
यावेळी प्रा. डॉ. मधू सावंत मणाल्या की, मराठी भाषा बोलणारी समृद्ध पिढी तयार झाली पाहिजे. बचतगटामुळे महिलांना वेगळे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्यात वाचन संस्कृती रुजली पाहिजे. समूह मनाच्या मानसिकता व जाणिवांचा गुंता सोडवण्याचे लेखन झाले पाहिजे. गुणात्मक व संख्यात्मक साहित्य संमेलनात आले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रविण गिरी यांनी केले तर समारोप समारंभानंतर संगितकार शिवकुमार मोहेकर यांचा संगित दरबार झाला.
 
Top