उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 8) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या 103 प्रकरणात समझोता होऊन तडजोडीअंती संबंधितांना 5 कोटी 56 लाख 12 हजार 509 रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले.
उमरगा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत सहा पॅनलद्वारे 381 विविध प्रकरणाचा न्याय निवाडा करण्यात आला. सहा पॅनेलमधून जिल्हा न्यायधीश एस. बी. साळुंखे, दिवाणी न्यायाधीश एन. के. कारंडे, सहदिवाणी न्यायाधीश एस. ए. कानशिडे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम. टी. बिलाल, न्यायाधीश एस. एस. चव्हाण, न्यायाधीश ए. डी. पाटील यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवसभर चाललेल्या या न्यायनिवड्यात विविध 381 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात भूसंपादन, धनादेश, कौटुंबिक, मोटार अपघात, दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणाचा समावेश होता. 381 प्रकरणांपैकी 103 प्रकरणात तडजोडी अंती संबधितांना पाच कोटी 56 लाख बारा हजार 509 रुपये देण्याची तडजोड करण्यात आली. दरम्यान, नोंदणी न केलेल्या 98 प्रकरणांपैकी नऊ प्रकरणात तडजोड झाली. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उमरगा, तुरोरी, आलूर व गुंजोटी शाखेतील 60 हजार 700 रूपयांची तडजोड करण्यात आली. सरकारी अभियोक्ता, विधिज्ञ मंडळ अध्यक्ष अॅड. दिलीप सगर यांच्यासह विधिज्ञ मंडळ, बॅँकांचे प्रतिनिधी व ग्राहकांनी राष्ट्रीय लोकअदालतीच्या कामकाजात सहभाग घेतला.

 
Top