उस्मानाबाद/प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उस्मानाबाद शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 101 बांधवांनी रक्तदान करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. तर महिलांनी देखील या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जातीधर्मांचा आदर करणारे राजे होते. त्यांच्या राज्यव्यवस्थेत हिंदू, मुसलमान असा भेद कधीच नव्हता. महाराजांच्या सैन्यदलातही हजारो विश्वासू मुस्लिम सैनिक होते. त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज असून समाजातील सलोखा कायम राहावा या हेतुने उस्मानाबाद शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने शनिवारी (दि.15) हजरत ख्वाजा शम्सोद्दीन गाजी दर्गा परिसरातील ताज चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे संपूर्ण संयोजन मुस्लिम बांधवांनी केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समितीचे मार्गदर्शक प्रकाश जगताप, अध्यक्ष अॅड. योगेश सोन्ने पाटील, पोलीस निरीक्षक डी. एम. शेख,  वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील खान अहमद, जमशेद अहमद, लतीफ शेख, सह्याद्री फाऊंडेशन्सचे अध्यक्ष डॉ. दिग्गज दापके-देशमुख, प्रेरणा सामाजिक संस्थेचे नितीन तावडे, पत्रकार रवींद्र केसकर खंडू राऊत, प्रभाकर निपाणीकर यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, मुस्लिम बांधव उपस्थित होते.
या शिबिरात 101 बांधवांनी रक्तदान केले. यामध्ये 4 महिलांनी देखील रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरात रक्त संकलनासाठी सह्याद्री ब्लड स्टोअरेज सेंटरचे सहकार्य लाभले. दिवसभर अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
 
Top